
दल सरोवराच्या लाटांवरून कटऱ्याच्या कुशीत… १०० यात्रेकरूंच्या आठवणींचा जिवंत प्रवास! – अमरनाथ यात्रा म्हणजे केवळ एका पवित्र गुहेपर्यंत पोहोचण्याचा प्रवास नाही. ही यात्रा माणसांना जवळ आणते, अनोळखी चेहऱ्यांना मित्र बनवते आणि काही दिवसांतच शंभर वेगवेगळ्या व्यक्तींना एका विशाल कुटुंबात गुंफते. आज त्या कुटुंबाच्या प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा दिवस उजाडला होता.



आजचा दिवस माझ्यासाठी आणखी एका कारणाने खास होता. १९९७ साली मी, माझी पत्नी जयश्री आणि त्यावेळी अगदी लहान असलेल्या माझ्या मुली नेहा व पूजा यांनी काश्मिरी पोशाखात काढलेला एक फोटो मुलींनी आजही जपून ठेवला आहे. त्याच शैलीत पुन्हा एकदा फोटो काढण्याचा योग आज आला. त्या वेळी हातात बोट धरून चालणाऱ्या त्या दोन चिमुकल्या मुलींना आज प्रत्येकी दोन-दोन लेकरं आहेत. काळ इतक्या वेगाने पुढे निघून गेला, हे त्या क्षणी प्रकर्षाने जाणवले. काही क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त होतात; पण त्यामागे दडलेले आयुष्याचे प्रवास मात्र शब्दांत मावणे कठीण असते.



आज सकाळी नेमके सात वाजता दल सरोवरावरील हाऊसबोट्सना निरोप दिला . सर्व सामान घेऊन शिकाऱ्यांतून शिकारा स्टँड क्रमांक ७ पर्यंत पोहोचायचे आणि साडेसात वाजता पाच बसेसमधून कटऱ्याकडे प्रस्थान करायचे, असा आखीव-रेखीव कार्यक्रम होता. शिकाऱ्यात बसल्यानंतर मी स्वतः चप्पू हातात घेऊन शिकारा चालवू लागलो. ते पाहून अनेक सहप्रवासी आश्चर्यचकित झाले. काहींनी तर माझा शिकारा चालवतानाचा व्हिडिओही काढला. सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणांत दल सरोवर एखाद्या विशाल आरशासारखे शांत भासत होते. शिकाऱ्यांच्या चप्पूंनी पाण्यावर उमटणारी वलये, दूरवर दिसणारे डोंगर, पाण्यात पडणारी त्यांची प्रतिबिंबे आणि मंद वाऱ्याची झुळूक… हे सारे दृश्य मनात कायमचे कोरले जात होते.


अविका राजपूत, अर्णव राजपूत, इशानी चौहान आणि श्रावणी चौहान, अनया,अनघा येवले या लहानग्यांच्या डोळ्यांत कुतूहल होते, तर जयश्री ठाकूर, अमोल चौहान, पूजा चौहान, प्रसाद पवार, प्रमोद पुण्यपवार, जयवंत लोखंडे, सूरज बैस आणि कल्याणी बैस काश्मीरच्या या अखेरच्या सकाळी प्रत्येक क्षण मनात साठवत होते.शिकारे एकामागोमाग एक स्टँड क्रमांक ७ कडे सरकत होते. हाऊसबोट्स दूर होत होत्या आणि मनात एकच विचार येत होता—काही ठिकाणे आपण सोडतो, पण ती ठिकाणे आपल्याला कधीच सोडत नाहीत.


प्रवासात प्रत्येक दिवस आपल्या मनाप्रमाणे घडतोच असे नाही. काही कारणास्तव आमच्या परिवारातील सतेज राजपूत, अजिंक्य राजपूत, हनुमानसिंह गौर, वंदना गौर, भारत चव्हाण आणि नंदाबाई चव्हाण या सहा सदस्यांना श्रीनगरमध्येच थांबावे लागले. शरीराने ते आमच्यासोबत कटऱ्याला येऊ शकले नाहीत; पण मनाने ते आमच्या प्रत्येक क्षणात सहभागी होते. साडेसात वाजता पाचही बसेस मार्गस्थ झाल्या. प्रत्येक बसमध्ये उत्साह ओसंडून वाहत होता. सुरेश व निशा ठाकूर, नारायणसिंह व शोभा चव्हाण, विजयसिंह व सलोना चौहान, सुभाष व मदनेश्वरी देवकते, साईप्रसाद आणि गौरी देवकते आपापल्या सामानाची खात्री करत होते. प्रशांत व शर्मिला होट्टे, विश्वनाथ व मिना , अनुजा आणि अपूर्वा झुंजारे यांच्या गप्पांनी वातावरण आनंदी झाले होते.
कटऱ्याकडे निघण्यापूर्वी आमचा पहिला महत्त्वाचा टप्पा होता—शंकराचार्य मंदिर. अमरनाथ गुहेतील बर्फानी बाबांचे दर्शन घेतल्यानंतर भगवान शंकराच्या या प्राचीन मंदिरात नतमस्तक होण्याची प्रत्येकाची इच्छा होती. मात्र मंदिरात इतकी मोठी रांग होती की जवळपास एक तास उभे राहूनही ती तसूभर पुढे सरकली नाही. त्यामुळे आम्हांपैकी अनेकांनी मंदिराच्या पायरीला आणि कळसाला नमस्कार करून परतण्याचा निर्णय घेतला.पण शंकराचार्य दर्शनाचा योग श्रीकांत अकोलकर, सुनिता प्रकाश देशमुख, मेघा व श्रीराम पाठक, छाया चौधरी, संजय चौधरी, प्रियंका व दीपक दुर्गे, दिग्विजयराजे दुर्गे, संध्या व दादाराव कदम, सपना व सुनील अग्रवाल, अपर्णा व विश्राम कुंटूरकर, सुनीता देशमुख, माधवी बाटवे, गंगाधर मुंगल, सारिका गवळी, सुषमा मोरे, अन्नपूर्णा खरणे, आनीता व रामराव वराड आणि लक्ष्मी मठपती यांना लाभला. त्यांनी तब्बल तीन तास रांगेत उभे राहून भगवान शंकराचे दर्शन घेतले. त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून प्रतीक्षेचे सार्थक काय असते, याचा प्रत्यय आला.मंदिर परिसरातून दिसणाऱ्या श्रीनगरच्या विहंगम दृश्याचा आनंद संजय व संगीता खूपसे घेत होते, तर रणजीत व मेधा धर्मापुरीकर या निसर्गरम्य क्षणांना कॅमेऱ्यात जपून ठेवत होते.
सकाळी अकराच्या सुमारास आमचा ताफा कटऱ्याच्या दिशेने निघाला. मागे श्रीनगर राहिले होते आणि समोर होता हिमालयाच्या कुशीतून जाणारा लांबचा प्रवास. एका बाजूला उंच पर्वतरांगा, दुसऱ्या बाजूला वेगाने वाहणाऱ्या नद्या, मधूनच येणारे बोगदे आणि प्रत्येक वळणावर बदलणारे निसर्गाचे रूप… काश्मीरचा निरोप घेणे सोपे नव्हते.जयंत व विद्या आडे, गुलाब व कांचन इंगोले, साईप्रसाद हळदे, संतोष दराडे, कैलाश वैष्णव आणि धुपसिंग राठोड बसच्या खिडकीतून दिसणारे नयनरम्य दृश्य डोळ्यांत साठवत होते.इतका मोठा प्रवास आणि बसमध्ये शांतता, हे आमच्या यात्रेत शक्यच नव्हते. कुठे जुन्या हिंदी गाण्यांची मैफल, कुठे अंताक्षरी, कुठे विनोद, तर कुठे अमरनाथ दर्शनातील अनुभवांची देवाणघेवाण सुरू होती. हनमंत मारवाडी, नागोराव व अर्चना डिग्रसे, नामदेव व मंगला पांचाळ, भाग्यश्री पांचाळ, प्रल्हाद व सुचित्रा नवघरे, गणपत वाघमारे, विश्वनाथ व कौशल्याबाई पंडागळे, गंगामणी व बजरंग खंदारे, नरसादेवी ताटपल्लेवार, अंजली अन्नपुरे, प्रशांत आणि संगिता जोशी यांच्या गप्पांनी प्रवास अधिकच रंगतदार झाला.
खरं तर अशा यात्रांमध्ये अंतर किलोमीटरमध्ये मोजले जात नाही. ते मोजले जाते हास्याच्या क्षणांत, गप्पांच्या मैफलीत, परस्परांच्या मदतीत आणि नकळत निर्माण झालेल्या मैत्रीत.या संपूर्ण यात्रेत माणुसकीचे अनेक प्रसंग अनुभवायला मिळाले. कोणाला पाण्याची गरज भासली, कोणाचे सामान उचलायचे होते, कोणाला बसमध्ये जागा बदलून द्यायची होती—कोणीही मागे हटले नाही. प्रत्येकाने प्रत्येकाला आपले मानले. हीच या यात्रेची खरी कमाई होती.या प्रवासात छाया आणि अशोक दालपे यांनी सर्व यात्रेकरूंना बिसलेरी पाण्याची व्यवस्था करून दिली. प्रवासात थंड पाण्याचा प्रत्येक घोट त्यांच्या प्रेमाची आठवण करून देत होता.
संध्याकाळी अखेर आमचा ताफा कटऱ्यातील हॉटेल ग्रँड शरण येथे पोहोचला. दोन जणांमध्ये एक अश्या प्रशस्त वातानुकूलित खोल्या मिळाल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. दिवसभराच्या प्रवासाने शरीर थकले होते; पण मन मात्र प्रसन्न होते. कारण एका बाजूला बाबा बर्फानीच्या दर्शनाचे समाधान होते, तर दुसऱ्या बाजूला माता वैष्णोदेवीच्या दर्शनाची उत्कंठा!
दरवर्षीप्रमाणे नांदेड चे प्रतिष्ठित व्यापारी हृदयनाथ सोनवणे यांच्या वतीने सर्वांसाठी स्वादिष्ट जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. आमच्या ग्रुप मध्ये असलेल्या राधा आणि किशन चव्हाण यांनी सर्व यात्रेकरूंना मिनरल वॉटर उपलब्ध करून दिले. अशा छोट्या-छोट्या सेवांमुळे यात्रेचा आनंद कितीतरी पटींनी वाढत असतो.सर्वांना सकाळी पाच वाजता तयार राहण्याच्या सूचना देऊन मी माझ्या खोलीत आलो. दिवसभराच्या आठवणी डोळ्यांसमोर तरळत होत्या. दल सरोवर मागे राहिले होते, हिमालय दूर जात होता, पण मनात मात्र काश्मीर अजूनही जिवंत होते. उद्या माता वैष्णोदेवीच्या दरबाराकडे वाटचाल होती… आणि मन पुन्हा एकदा नव्या भक्तिभावाने भरून आले होते. (क्रमशः…)
