अमरनाथ गुहेतून – भाग ९  (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

“गुलमर्गच्या हिरव्यागार कुशीत… निसर्ग, माणुसकी आणि अन्नदानाचा अविस्मरणीय संगम!” – अमरनाथ यात्रेतील प्रत्येक दिवस वेगळा असतो. एखादा दिवस श्रद्धेची परीक्षा घेतो, एखादा शरीराच्या क्षमतेची कसोटी पाहतो, तर एखादा दिवस आयुष्यभर पुरेल एवढ्या आठवणी मनाच्या ओंजळीत अलगद ठेवून जातो. अमरनाथच्या पवित्र गुहेत बर्फानी बाबांचे दर्शन घेतल्यानंतर मनात एक विलक्षण समाधान होते. शरीर थकलेले असले तरी अंतर्मन मात्र प्रसन्न होते. आता यात्रेतील कठीण टप्पे मागे पडले होते आणि आज आमची वाट होती पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलमर्गकडे! सकाळी सात वाजता सर्व यात्रेकरू उत्साहाने तयार झाले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता. अमरनाथ दर्शनाचा आध्यात्मिक आनंद अजूनही मनात ताजा होता आणि आता त्याला काश्मीरच्या अप्रतिम सृष्टीसौंदर्याची जोड मिळणार होती. आमच्या गाड्या श्रीनगरमधून गुलमर्गच्या दिशेने निघाल्या. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पसरलेली हिरवाई, उंचच उंच सुचीपर्णी वृक्ष, डौलदार चिनार, दूरवर दिसणारे पर्वत आणि त्यांच्या अंगाखांद्यावर विसावलेले ढग… निसर्गाने जणू आमच्या स्वागतासाठी हिरवा गालिचाच अंथरला होता. पहाटेची थंड हवा चेहऱ्याला स्पर्श करत होती. खिडकीतून बाहेर पाहताना जाणवत होते की, इथे निसर्ग बोलत नाही, तरी खूप काही सांगतो. पर्वतांच्या मौनातही एक भाषा असते, झाडांच्या सळसळीतही एखादे संगीत दडलेले असते आणि काश्मीरच्या हवेत तर जणू परमेश्वराने स्वतःचा सुगंध मिसळलेला असतो.

आलू पराठा… आणि सोळा हजारांचे बिल! – सकाळच्या प्रवासात सर्वांच्या पोटात कावळे ओरडू लागले होते. त्यामुळे रस्त्यातील एका हॉटेलवर आमच्या गाड्या थांबल्या. गरमागरम आलू पराठे, चहा आणि कॉफीची ऑर्डर देण्यात आली. थंडगार वातावरणात तव्यावरून थेट ताटात आलेल्या गरम आलू पराठ्याची मजाच काही और होती! सर्वांनी मनसोक्त नाश्ता केला. सोबत बिसलरीच्या बाटल्याही घेतल्या. वातावरण आनंदी होते. पण नाश्ता संपल्यानंतर जेव्हा बिल समोर आले, तेव्हा मात्र माझ्या चेहऱ्यावरचे भाव पाहण्यासारखे झाले असतील! बिल होते तब्बल सोळा हजार रुपये! क्षणभर मनात विचार आला—किती विलक्षण विरोधाभास आहे! अमरनाथच्या परिसरात विविध लंगरमध्ये पंचपक्वान्नांची रेलचेल असते. पुरी, भाजी, डाळ, भात, मिठाई, चहा, कॉफी, दूध… हवे ते खा, कितीही खा आणि तेही पूर्णपणे मोफत! पण श्रीनगरच्या परिसरात आलो आणि एक आलू पराठा शंभर रुपयांचा! आजच्या एका वेळच्या नाश्त्यासाठी पाच हजार रुपयांची देणगी उपलब्ध होती. आता सोळा हजारांचे बिल पाहून माझी अवस्था थोडी विचारमग्न झाली. शेवटी एक व्यावहारिक निर्णय घेतला. प्रत्येक यात्रेकरूला नाश्त्यासाठी प्रत्येकी पन्नास रुपये नगद द्यायचे आणि त्यापेक्षा जास्त बिल असेल तर ते संबंधिताने स्वतः भरायचे. आजच्या नाश्त्याच्या प्रायोजक होत्या परभणीच्या वंदना शेळके. त्यांच्या सेवाभावामुळे यात्रेकरूंच्या सकाळची सुरुवात स्वादिष्ट आणि आनंददायी झाली.

गुलमर्ग – सौंदर्य अप्रतिम, अनुभव मात्र संमिश्र! – काही वेळातच आम्ही गुलमर्गच्या परिसरात पोहोचलो. हिरव्यागार कुरणांवर पसरलेली रंगीबेरंगी फुले, आकाशाला स्पर्श करणारी पर्वतरांग, दूरवर दिसणारी हिमशिखरे आणि थंडगार हवा… डोळे जिथे जातील तिथे निसर्गाचे अप्रतिम चित्र! गुलमर्गचे सौंदर्य पाहताना वाटते की, निसर्गाने आपल्या सर्वांत सुंदर रंगांची पेटी याच ठिकाणी उघडली असावी. पण प्रत्येक सुंदर अनुभवाला एखादी दुसरी बाजूही असते. गुलमर्गमध्ये घोडेवाले आणि गाइड्स यांच्याकडून पर्यटकांना होणारा त्रास हा अनेकदा अनुभवाचा भाग बनतो. त्यामुळे मी सर्व यात्रेकरूंना आधीच स्पष्ट सूचना दिली होती—“आता इथे प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यायची. घोडेवाले गोंधळ घालू शकतात. इथे ग्रुप लीडर म्हणून मी कोणतीही जबाबदारी घेणार नाही. छोट्या-छोट्या ग्रुपमध्ये जा, जीप ठरवा आणि व्यवस्थित फिरून या.” सुदैवाने सर्वांनी सूचनांचे पालन केले. मोठ्या यात्रेत शिस्त, संयम आणि परस्पर सहकार्य असेल, तर कितीही कठीण परिस्थिती सहज हाताळता येते, याचा अनुभव आम्हाला वारंवार येत होता. गुलमर्ग केवळ उन्हाळ्यातील हिरव्यागार सौंदर्यासाठी प्रसिद्ध नाही. हिवाळ्यात जेव्हा संपूर्ण परिसर बर्फाची शुभ्र चादर पांघरतो, तेव्हा गुलमर्ग जगातील प्रसिद्ध स्कीइंग स्थळांपैकी एक बनते. नवशिक्यांसाठी प्रशिक्षणापासून ते अनुभवी स्कीअर्ससाठी आव्हानात्मक उतारांपर्यंत सर्व काही येथे उपलब्ध आहे.

गंडोला – आकाशात झुलण्याचा रोमांचकारी अनुभव!  – गुलमर्गमध्ये सर्वांत मोठे आकर्षण कोणते, असा प्रश्न विचारला तर उत्तर एकच—गंडोला! आशियातील सर्वोच्च आणि जगातील अत्यंत उंच केबल कार प्रकल्पांपैकी एक असलेला गुलमर्ग गंडोला म्हणजे केवळ रोपवेची सफर नाही; तो पृथ्वीपासून आकाशाकडे जाणारा एक रोमांचकारी प्रवास आहे. गुलमर्ग ते काँगडोरी हा पहिला टप्पा आणि काँगडोरीपासून आणखी उंच शिखराकडे जाणारा दुसरा टप्पा. आमच्या काही यात्रेकरूंनी दोन्ही टप्प्यांचा आनंद घेतला. केबल कार हळूहळू वर चढत असताना खाली दिसणारी हिरवीगार कुरणे लहान होत जातात. देवदार आणि सुचीपर्णी वृक्ष खेळण्यांसारखे दिसू लागतात. दूरवरच्या पर्वतरांगा अधिक जवळ येतात आणि निळ्याशार आकाशात तरंगणाऱ्या ढगांच्या सान्निध्यात आपण पृथ्वी आणि आकाशाच्या मधोमध कुठेतरी तरंगत असल्याचा भास होतो. त्या क्षणी मनात एकच विचार येतो—माणूस कितीही मोठा झाला, तरी निसर्गासमोर तो किती लहान आहे!

महाराणी मंदिर आणि ‘जय जय शिवशंकर’च्या आठवणी

गंडोलाच्या रोमांचकारी सफरीनंतर आमचा पुढचा मुक्काम होता गुलमर्गमधील प्रसिद्ध महाराणी मंदिर. एका छोट्याशा टेकडीवर वसलेले हे शिवमंदिर आकाराने लहान असले, तरी त्याचा इतिहास आणि त्याचे सांस्कृतिक महत्त्व खूप मोठे आहे. काश्मीरचे शेवटचे महाराजा हरीसिंग यांच्या महाराणीने हे मंदिर बांधले होते. शिव-पार्वतीला समर्पित असलेल्या या मंदिराच्या परिसरात एक विलक्षण शांतता अनुभवायला मिळते. हिंदी चित्रपटप्रेमींसाठी या मंदिराची आणखी एक खास ओळख आहे. राजेश खन्ना आणि मुमताज यांच्यावर चित्रित झालेले लोकप्रिय गीत “जय जय शिवशंकर” याच परिसरात चित्रित करण्यात आले होते. चित्रपटातील ते दृश्य आठवत मंदिरासमोर उभे राहिल्यावर जुन्या आठवणी आणि भक्तिभाव यांचा एक वेगळाच संगम अनुभवायला मिळतो. छोटंसं मंदिर, शांत परिसर, टेकडीवरून दिसणारा गुलमर्गचा निसर्ग आणि भोलेनाथाचे सान्निध्य—हा क्षण मनाच्या गाभाऱ्यात कायमचा कोरला गेला.

मामा खालसा हॉटेलमधील सेवाभावाची थाळी

सर्व यात्रेकरू गंडोला राईड आणि गुलमर्ग दर्शनाचा आनंद घेत असताना मी मात्र मामा खालसा हॉटेलमध्ये गेलो. छोटेखानी हॉटेल होते; पण तिथे मिळणाऱ्या जेवणात घरगुती चव आणि आत्मीयता होती. सर्व यात्रेकरूंसाठी दुपारच्या भोजनाची ऑर्डर दिली. विशेष म्हणजे, नाव जाहीर न करण्याच्या अटीवर एका शिवभक्ताने या जेवणाची संपूर्ण व्यवस्था केली होती. अन्नदानाची खरी सुंदरता हीच असते. काही लोक दान करतात आणि त्याची प्रसिद्धी व्हावी अशी अपेक्षा ठेवतात; पण काही हात असेही असतात, जे देतात आणि स्वतःचे नावही समोर येऊ देत नाहीत. अशा निनावी सेवाभावासमोर मन आपोआप नतमस्तक होते. घरच्यासारख्या रुचकर जेवणाचा आस्वाद घेत असतानाच अचानक माझा फोन वाजला. स्क्रीनवर ट्रू कॉलरमध्ये नाव दिसत होते—मुसा खान. माझा एक नियम आहे. फोन ओळखीच्या व्यक्तीचा असो किंवा स्क्रीनवर फक्त अनोळखी नंबर दिसत असो, शक्यतो प्रत्येक फोन उचलायचा.

एखाद्या कामात व्यस्त असल्यामुळे फोन उचलता आला नाही, तरी मोकळा झाल्यानंतर मिस्ड कॉल पाहून परत फोन करायचा. मी फोन उचलला. समोरून प्रश्न आला—“अमरनाथ गुहेतून हे लेख तुम्ही स्वतः लिहिता का?” क्षणभर मी दचकलोच! मनात पहिला विचार आला—आपण लेखात काश्मिरी लोकांबद्दल काही चुकीचे लिहिले का? कुणाच्या भावना दुखावल्या का? समोरची व्यक्ती कोण आणि हा प्रश्न का विचारत आहे? पण पुढील काही क्षणांतच माझ्या मनातील शंका पूर्णपणे दूर झाली. फोन करणारे होते सनातनी मुस्लिम विचारमंचचे संस्थापक अध्यक्ष मुसाखान मुस्ताकखान, किनवट. त्यांनी स्वतःचा सविस्तर परिचय दिला. माझे ‘अमरनाथ गुहेतून’ हे लेख ते नियमित वाचत असल्याचे सांगितले आणि नंतर एक असा प्रश्न विचारला, ज्याने माझे मन अक्षरशः भरून आले. ते म्हणाले—“आम्ही सुद्धा अन्नदान करू शकतो का?” मी क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिले—“नेकी और पूछ पूछ!” चांगल्या कामासाठी परवानगी कसली? आणि काही वेळातच मुसाखान मुस्ताकखान यांनी एका वेळच्या भोजनासाठी तब्बल ₹१५,००० पाठवले! त्या क्षणी मला वाटले, अमरनाथ यात्रा फक्त पर्वतावरच्या पवित्र गुहेपर्यंत जाणारी यात्रा नाही. ही माणसाला माणसाशी जोडणारी यात्रा आहे. धर्म वेगळे असतील, उपासनेच्या पद्धती वेगळ्या असतील, नावं वेगळी असतील; पण भुकेल्याला अन्न देताना हाताचा धर्म विचारला जात नाही.

मुसाखान यांच्या या दातृत्वाची माहिती मी आमच्या सर्व यात्रेकरूंना सांगितली. त्यांच्या सेवाभावाने आमच्या ग्रुपमधील अनेकांची मनेही प्रेरित झाली. गंगाधरराव मुंगल, नेहा व सतेज राजपूत, पुणे, पूजा व अमोलसिंह चौहान, हैदराबाद, संजय व छाया चौधरी, जयंत आडे, नागपूर आणि संजय खुपसे यांनीही यात्रेकरूंच्या अन्नदान, नाश्ता आणि पाण्याच्या व्यवस्थेसाठी उत्स्फूर्तपणे पुढाकार घेतला. कोणी पाण्याची व्यवस्था केली, कोणी नाश्त्याची जबाबदारी स्वीकारली, कोणी आर्थिक योगदान दिले, तर कोणी पुढील प्रवासात यात्रेकरूंना भोजन देण्याची इच्छा व्यक्त केली. ही कोणतीही स्पर्धा नव्हती. कोणावरही कोणताही आग्रह नव्हता. अन्नदानासाठी फोर्स नाही, जबरदस्ती नाही आणि अपेक्षाही नाही. ज्याच्या मनात स्वेच्छेने सेवाभाव जागा झाला, त्याने आनंदाने आपला सहभाग दिला. कारण दानाची किंमत रकमेवर ठरत नाही; त्यामागील भावनेवर ठरते. अमरनाथ यात्रेतील हेच तर खरे वैभव आहे! एखाद्याने दिलेला पाण्याचा एक घोट, एखाद्याने प्रेमाने वाढलेला अन्नाचा घास आणि थकलेल्या यात्रेकरूच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधानाचे हास्य—यापेक्षा मोठी पूजा आणखी कोणती असू शकते?

श्रीनगरकडे परतीचा प्रवास… आणि तृप्त मनांची शिदोरी – दुपारचे चार वाजले आणि गुलमर्गच्या निसर्गरम्य परिसराला निरोप देण्याची वेळ आली. गाड्या श्रीनगरच्या दिशेने निघाल्या. खिडकीबाहेर गुलमर्गचे हिरवेगार सौंदर्य हळूहळू मागे सरकत होते; पण दिवसभरातील अनुभव मनात कायमचे साठत होते. कालच्या भोजन वाटपात बराच वेळ गेला होता. त्यामुळे आज श्रीनगरला पोहोचल्यानंतर पार्सल स्वरूपात जेवण देण्याची व्यवस्था करण्यात आली. आणि या भोजनामागे होते तब्बल गेल्या २६ वर्षांपासून दरवर्षी सातत्याने अन्नदान करणारे नांदेडचे प्रतिष्ठित व्यापारी सुभाष बंग. सलग २६ वर्षे अन्नदानाची परंपरा जपणे ही साधी गोष्ट नाही. काळ बदलतो, परिस्थिती बदलते, माणसांची प्राधान्ये बदलतात; पण काही माणसांच्या मनातील सेवाभाव मात्र वर्षानुवर्षे तसाच टिकून राहतो. सुभाष बंग हे त्याचेच सुंदर उदाहरण. उत्तर भारतात, काश्मीरच्या कुशीत, भोलेनाथाच्या यात्रेत नांदेडच्या एका अन्नदात्याच्या सेवाभावातून मिळालेल्या त्या भोजनाच्या पाकिटात फक्त अन्न नव्हते—त्यात २६ वर्षांची परंपरा होती, आपुलकी होती आणि यात्रेकरूंबद्दलचे प्रेम होते.

रात्र होत होती. दिवसभराचा थकवा शरीराला जाणवत होता; पण मन मात्र विलक्षण तृप्त होते. आजच्या दिवसाने आम्हाला गुलमर्गचे सौंदर्य दाखवले, गंडोलाचा थरार दिला, महाराणी मंदिरातील शांतता अनुभवायला दिली; पण त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे माणुसकीची काही विलक्षण रूपे दाखवली. आजचा दिवस माणुसकीच्या अनेक सुंदर रंगांनी सजला होता.

त्या रात्री एक विचार मनात सतत घोळत राहिला—अमरनाथच्या पवित्र गुहेत बर्फाचे शिवलिंग दिसते… पण यात्रेच्या वाटेवर जेव्हा एक माणूस दुसऱ्या माणसासाठी निःस्वार्थपणे पुढे येतो, तेव्हा तिथेही भोलेनाथाचेच दर्शन घडत असते! गुलमर्ग मागे पडले होते. श्रीनगर जवळ आले होते. पण निसर्गाच्या सौंदर्यापेक्षाही अधिक सुंदर अशी माणुसकीची काही दृश्ये आमच्या मनात कायमची कोरली गेली होती. आणि आमची यात्रा अजून संपलेली नव्हती… कारण पुढच्या वळणावर आणखी एक नवा अनुभव आमची वाट पाहत होता!        (क्रमशः)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!