अमरनाथ गुहेतून – भाग ८ (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

बाबांच्या सान्निध्यातून… आता श्रीनगरच्या कुशीत!
कालचा दिवस आयुष्यातील सर्वांत अविस्मरणीय ठरला होता. बाबा बर्फानींचे दर्शन, तब्बल २८ किलोमीटरचा खडतर प्रवास आणि हजारो भाविकांच्या “बम बम भोले”च्या जयघोषात आम्ही पुन्हा बालटाल बेस कॅम्पमध्ये परतलो होतो. शरीर थकले होते, पण मन मात्र अपार समाधानाने भरून गेले होते. आज श्रीनगरकडे परतीचा प्रवास होता. एका अर्थाने यात्रेचा धार्मिक टप्पा पूर्ण झाला होता आणि आता निसर्गसौंदर्याचा अध्याय सुरू होणार होता.

यात्रेच्या मार्गावर मी भारतीय जनता पक्षातर्फे अमरनाथ यात्रेकरूंचे स्वागत करणारे चार बॅनर लावले होते. त्या बॅनरवर भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी, खासदार मा. अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, संजय कोडगे, ॲड. चैतन्य देशमुख, भारतीय जनता पक्षाचे महानगराध्यक्ष व आमदार अमर राजूरकर, जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकाराव हंबर्डे, ॲड. किशोर देशमुख तसेच माझे छायाचित्र होते. काश्मीरसारख्या संवेदनशील भागात हे स्वागत बॅनर पाहून अनेक यात्रेकरूंनी आनंद व्यक्त केला.

याच बॅनरमुळे पश्चिम बंगालमधील भाजपचे पदाधिकारी बिमल बॅनर्जी सकाळी खास मला भेटण्यासाठी आले. त्यांनी मनापासून अभिनंदन करत सांगितले की, काश्मीरमध्ये अशा प्रकारे भारतीय जनता पक्षाचे स्वागत बॅनर लावण्याचे धाडस फार कमी लोक करतात. आमच्या यात्रेच्या नियोजनाविषयी त्यांनी सविस्तर माहिती घेतली. पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांचे ते निकटवर्तीय असल्याने भविष्यात बंगालमधूनही अमरनाथ यात्रेचा गट आणण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. अमरनाथ यात्रा केवळ देवदर्शनापुरती मर्यादित राहत नाही, तर देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांना जोडणारा एक राष्ट्रीय सेतू आहे, याची पुन्हा एकदा जाणीव झाली.

रात्री सर्वांना सकाळी आठ वाजेपर्यंत तयार राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. निवांत झोपण्याचा विचार होता; पण बालटाल बेस कॅम्पवरील सततच्या घोषणांमुळे पहाटेच जाग आली. बाहेर पडताच हजारो यात्रेकरू नव्या उत्साहाने दिवसाची तयारी करत असल्याचे दृश्य पाहायला मिळाले.

मागील दिवशीच्या २८ किलोमीटरच्या पायी प्रवासामुळे काही यात्रेकरूंना अंगदुखी, पायदुखी आणि थकवा जाणवत होता. त्यामुळे प्रत्येक टेंटमध्ये जाऊन सर्वांची प्रकृती विचारली. खबरदारी म्हणून सात जणांना घेऊन जवळच उभारलेल्या शासकीय रुग्णालयात गेलो. तात्पुरते असले तरी रुग्णालय अत्यंत स्वच्छ, सुसज्ज आणि शिस्तबद्ध होते. डॉक्टरांनी आस्थेने तपासणी करून औषधे दिली व काळजी करण्यासारखे काहीही नसल्याचे सांगितले. यात्रेकरूंच्या आरोग्यासाठी प्रशासनाने केलेली व्यवस्था निश्चितच कौतुकास्पद होती.

अमरनाथ यात्रेतील सर्वांत प्रेरणादायी गोष्ट म्हणजे येथील लंगर सेवा. पंजाब, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, हरियाणा अशा अनेक राज्यांतील सेवाभावी संस्था हजारो भाविकांसाठी चोवीस तास अन्नदान करत होत्या. एका ठिकाणी इडली-सांबार, पोहे, उपमा, ब्रेड पकोडे आणि हलवा, तर दुसऱ्या ठिकाणी गरमागरम रोट्या, राजमा, वरण-भात, पराठे, खीर आणि जिलबी असा समृद्ध प्रसाद उपलब्ध होता. हजारो लोक जेवत होते, पण कुठेही गोंधळ नव्हता. विशेष म्हणजे अन्नाचा एक कणही वाया जाऊ नये यासाठी स्वयंसेवक स्वतः उभे राहून प्रत्येकाला सूचना देत होते. ही शिस्त आणि सेवाभाव मनाला स्पर्शून गेला.

एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवली. महाराष्ट्रातून दरवर्षी हजारो भाविक अमरनाथ यात्रेला येतात; परंतु महाराष्ट्राच्या नावाने एकही लंगर दिसला नाही. भविष्यात महाराष्ट्रातील सेवाभावी संस्था आणि उद्योगपतींनीही अशा सेवाकार्यात सहभागी व्हावे, अशी मनापासून इच्छा झाली. सकाळी साडेआठच्या सुमारास “बम बम भोले”च्या जयघोषात आम्ही बालटालचा निरोप घेतला. सामान पार्किंगपर्यंत नेण्यासाठी पिट्टूंची मदत घेतली. शेकडो वाहनांच्या गर्दीतही आमच्या गाड्या सहज सापडल्या. सर्वजण आपापल्या जागेवर बसताच पुन्हा एकदा भोलेनाथाच्या नावाचा गजर सुरू झाला. सोनमर्गचा साडेसहा किलोमीटर लांबीचा आधुनिक बोगदा सुरू होताच मी “जय भोले”च्या घोषणा सुरू केल्या. आश्चर्य म्हणजे संपूर्ण बोगदाभर एकाही क्षणी उत्साह कमी झाला नाही. बोगदा संपताच सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात आनंद व्यक्त केला. श्रद्धा, उत्साह आणि सामूहिक ऊर्जा यांचा तो अविस्मरणीय क्षण होता.

दुपारच्या सुमारास आम्ही मनीग्राम येथील लंगरमध्ये भोजनासाठी थांबलो. दहा विविध लंगर मध्ये राजमा, काश्मिरी आलू, फुलके, वरण-भात, दहीभात, जिलबी अशा स्वादिष्ट भोजनाने सर्वांचा थकवा क्षणात दूर झाला. लखनौ भंडाऱ्यावर लावलेल्या साऊंड सिस्टीम वर आमच्या ग्रुप ने रिमिक्स भजनावर मनसोक्त डान्स केला. दुसरे अनेक यात्रेकरू आमच्यात सामील झाले. बहुतेकांनी व्हीडिओ शूटिंग केले. आमचा उत्साही ग्रुप पाहून लंगर चे प्रधान ओमभाई यांनी माझा सत्कार केला. मी एवढेच सांगितले, “अमरनाथ यात्रा तीन शक्तींवर उभी आहे—भारतीय सैन्य, घोडेवाले आणि लंगरवाले. सैन्य आपले संरक्षण करते, घोडेवाले आपली सेवा करतात आणि लंगरवाले कोणतीही अपेक्षा न ठेवता प्रेमाने अन्नदान करतात. या तिन्हींच्या सेवेमुळेच लाखो भाविक सुरक्षितपणे बाबा बर्फानींचे दर्शन घेऊ शकतात.”हे शब्द ऐकून तेथील ओमभाई भावूक झाले. त्यांनी सर्व यात्रेकरूंना शीतपेयांची व्यवस्था केली. काही यात्रेकरूंनी तेथील आर्मी मेडिकल कॅम्पमध्ये आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधेही घेतली. सेवा आणि कृतज्ञतेचा हा सुंदर संगम मनात कायमचा कोरला गेला.

दुपारनंतर आम्ही श्रीनगरमध्ये पोहोचलो. डोंगरांच्या कुशीत वसलेले हे शहर प्रत्येक वेळी नव्याने मोहून टाकते. सर्वप्रथम आम्ही प्रसिद्ध निशात गार्डनला भेट दिली. हिरवीगार लॉन्स, रंगीबेरंगी फुलांचे ताटवे, वाहणारी कारंजी आणि दूरवर दिसणारा दल लेक यामुळे संपूर्ण परिसर नयनरम्य वाटत होता. प्रत्येक झाड, प्रत्येक फुलझाड आणि प्रत्येक पायवाट अतिशय देखणी आणि स्वच्छ दिसत होती. यानंतर आम्ही दल लेकवर पोहोचलो. तेथे माझे अनेक वर्षांपासूनचे सहकारी आणि ट्रॅव्हल पार्टनर सज्जादभाई आमच्या स्वागतासाठी उपस्थित होते. त्यांचा छोटासा सत्कार करून त्यांचे आभार मानले. माझा अनेक वर्षांचा अनुभव सांगतो की, सुरुवातीलाच माणसाचा सन्मान केला तर तो मनापासून सेवा करतो.

यावेळी प्रत्येक जोडप्यासाठी स्वतंत्र बेडरूम असलेल्या हाऊसबोट्स आधीच आरक्षित केल्या होत्या. त्यामुळे कोणतीही धावपळ झाली नाही. सर्वांनी थोडी विश्रांती घेतल्यानंतर शिकाऱ्यांमधून दल लेकची सफर सुरू झाली. चार जण एका शिकाऱ्यात बसून शांत पाण्यावरून होणारा प्रवास, सभोवताली तरंगणाऱ्या हाऊसबोट्स, दूरवर दिसणारे डोंगर, पाण्यात उमटणारे सूर्यास्ताचे प्रतिबिंब आणि मंद वाऱ्याच्या झुळका… हा अनुभव शब्दांत मांडणे कठीण आहे. अनेक यात्रेकरूंनी आयुष्यात प्रथमच शिकारा प्रवास अनुभवला आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता.

संध्याकाळी प्रत्येक हाऊसबोटमध्ये स्नेहभोजनाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. गतवर्षीच्या यात्रेतील सहप्रवासी लोहा येथील विमलताई चव्हाण यांनी प्रेमपूर्वक ही व्यवस्था केली होती. स्वादिष्ट भोजन, दल लेकवरील शांत वातावरण आणि दिवसभराच्या प्रवासानंतर मिळालेली विश्रांती यामुळे सर्वांचा थकवा पूर्णपणे दूर झाला.

बाबा बर्फानींच्या दर्शनाने मन आधीच तृप्त झाले होते. त्यातच काश्मीरच्या अप्रतिम निसर्गसौंदर्याने या यात्रेला आणखी एक सुंदर आयाम दिला. अमरनाथ यात्रा म्हणजे केवळ हिमलिंगाचे दर्शन नव्हे; ती सेवा, समर्पण, राष्ट्रीय एकात्मता, निसर्ग आणि माणुसकीचा एक अद्भुत संगम आहे. प्रत्येक प्रवास नवीन अनुभव देतो, नवीन माणसे जोडतो आणि आयुष्यभरासाठी अमूल्य आठवणी देऊन जातो. श्रीनगरच्या शांत रात्रीत हाऊसबोटवर विसावताना मनात एकच भावना होती—“भोलेनाथा, तुझ्या कृपेने आजचा दिवसही अविस्मरणीय झाला!”  (क्रमशः)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!