
डॉ. शंकरराव चव्हाण जीवनगौरव व कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कारांचे वितरण उत्साहात
नांदेड| “मी राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार असून, नांदेडचा आवाज दिल्लीच्या दरबारात बुलंद करण्यासाठी वकिली करणार,” अशी ग्वाही राज्यसभा खासदार तथा ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. उज्ज्वल निकम यांनी दिली. डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आयोजित डॉ. शंकरराव चव्हाण जीवनगौरव आणि कै. सौ. कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कार-२०२६ वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.



अॅड. निकम म्हणाले की, “कै. डॉ. शंकरराव चव्हाण यांनी मला वकिली करण्याची संधी दिली. त्यामुळे नांदेडशी माझे ऋणानुबंध कायम आहेत. समाजात वकिलांविषयी विविध भावना असल्या तरी वकिली ही न्यायव्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. आता खासदार म्हणून नांदेडच्या विकासासाठी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी दिल्लीत प्रभावीपणे आवाज उठवेन.”



यावेळी माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य अशोकराव चव्हाण म्हणाले, “अॅड. उज्ज्वल निकम यांच्या वकिलीचा अर्थच यश असा आहे. मराठवाड्याच्या विकासासाठी त्यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य निश्चितच मोलाचे ठरेल.” ते पुढे म्हणाले की, स्व. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीमुळेच आज मराठवाड्यात पाण्याची उपलब्धता आहे. त्यांच्या नियोजनामुळे या भागावर रेल्वेने पाणी आणण्याची वेळ कधीच आली नाही. समाजाला दिशा देणाऱ्या आणि आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी हे पुरस्कार दिले जातात, असेही त्यांनी सांगितले.


लोकमत समूहाचे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा यांनी डॉ. शंकरराव चव्हाण जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना हा क्षण भावनिक, अभिमानास्पद आणि जबाबदारीची जाणीव करून देणारा असल्याचे सांगितले. चव्हाण आणि दर्डा परिवारातील दशकांपासूनचे जिव्हाळ्याचे संबंध त्यांनी यावेळी अधोरेखित केले.


महिला बुद्धिबळ विश्वचषक विजेती दिव्या देशमुख यांनी कै. कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करत हा सन्मान तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, असे सांगितले. याशिवाय राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर, स्नेहसावलीचे संस्थापक डॉ. बालाजी आसेगावकर आणि मॅब एव्हिएशनचे संस्थापक मंदार भारदे यांनीही मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाला भोकरच्या आमदार अॅड. श्रीजयाताई चव्हाण, श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारिणी सदस्य अॅड. सुजयाताई चव्हाण, आमदार अमरनाथ राजूरकर, भीमराव केराम, माजी आमदार डी. पी. सावंत, दैनिक सत्यप्रभाचे कार्यकारी संपादक संतोष पांडागळे, भाजप जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार अमिताताई चव्हाण, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक निलाभ रोहण, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दैनिक सत्यप्रभाचे कार्यकारी संपादक संतोष पांडागळे, संपादक अभिजीत देशमुख, संचालक बालाजी जाधव, संदीप पाटील, सल्लागार सीए. मनोहर आयलाने, वृत्तसंपादक राजेश शिंदे आणि राजू गिरी यांनी विशेष पुढाकार घेतला.
