
प्राचार्यांसमवेत आढावा बैठक; शैक्षणिक व प्रशासकीय अडचणी सोडविण्यास प्राधान्य
नांदेड | विद्यार्थ्यांचे सर्वांगीण हित हेच विद्यापीठाचे सर्वोच्च प्राधान्य असून, विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये प्रभावी समन्वय निर्माण करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अधिक उज्ज्वल करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी केले.



विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात सोमवारी (१३ जुलै) आयोजित महाविद्यालयांच्या प्रशासकीय व शैक्षणिक अडचणींच्या आढावा बैठकीत प्राचार्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. सूर्यकांत जोगदंड, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, मानव्य विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग खडके, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे, वित्त व लेखाधिकारी डॉ. राजेश शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजपालसिंह चिखलीकर, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. भास्कर माने तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मारुती गायकवाड उपस्थित होते.




डॉ. चासकर यांनी सांगितले की, महाविद्यालयांप्रमाणेच विद्यापीठालाही मनुष्यबळ, परीक्षा नियोजन, प्राध्यापक मान्यता, अनुदान, दीक्षांत समारंभ आणि विविध प्रशासकीय प्रक्रियांशी संबंधित अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. मात्र, या सर्व प्रश्नांवर नियोजनबद्ध आणि सकारात्मक पद्धतीने उपाययोजना सुरू असून, महाविद्यालयांकडून प्राप्त होणाऱ्या अडचणी शक्य तितक्या कमी वेळेत निकाली काढण्यास विद्यापीठ प्राधान्य देत आहे. ते पुढे म्हणाले की, काही विषय राज्य शासन, विद्या परिषद किंवा व्यवस्थापन परिषद यांच्या मंजुरीनंतरच अंतिम निर्णयासाठी जावे लागतात. त्यामुळे काही प्रक्रियांना वेळ लागत असला, तरी विद्यार्थी आणि महाविद्यालयांच्या हिताचे निर्णय तातडीने घेण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे.


बैठकीत प्राचार्यांनी महाविद्यालयीन स्तरावरील विविध समस्या, सूचना आणि अपेक्षा मांडल्या. या चर्चेतून अनेक विधायक सूचना समोर आल्या. प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांनी प्राचार्यांनी मांडलेल्या सर्व मागण्या व सूचनांचा सकारात्मक विचार करून आवश्यक निर्णय लवकर घेण्यात येतील, अशी ग्वाही दिली. बैठकीचे आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मारुती गायकवाड यांनी केले.


