
दहा-बारा दिवसांपासून पाऊस गायब; सुकणाऱ्या पिकांमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली



हिमायतनगर, अनिल मादसवार| गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील वाघी गावातील महिलांनी पावसासाठी अनोखी प्रार्थना सुरु केली आहे. महिलांनी पैंनगंगा नदीतून पायी चालत जाऊन पाणी आणून गावातील मारुतीराय आणि श्री गणपती बाप्पाचा जलाभिषेक करत वरुणराजाने कृपा करावी आणि यंदाचा खरीप हंगाम सुगीचा व्हावा, असे साकडे घातले आहे.



यंदा हिमायतनगर तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी हळद लागवडीवर मोठा भर दिला असून, त्याचबरोबर सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद आदी पिकांची पेरणी केली आहे. मृग नक्षत्राच्या प्रारंभी झालेल्या पावसामुळे पेरण्या पूर्ण झाल्या; मात्र त्यानंतर पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.


सलग दहा-बारा दिवस पाऊस न झाल्याने अनेक ठिकाणी पिके सुकू लागली असून, काही शेतकऱ्यांचे बियाणे उगवलेही नाही. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. तर उगवलेली पिकेही पाण्याअभावी वाळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


पावसाअभावी चिंतेत सापडलेल्या शेतकऱ्यांनी आता देवाधर्माचा आधार घेतला असून, वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी विविध धार्मिक विधी आणि प्रार्थना केल्या जात आहेत. वाघी गावातील महिलांनी केलेला जलाभिषेकही त्याचाच एक भाग असून, लवकरात लवकर चांगला पाऊस पडून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
