राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची नांदेड जिल्हा कारागृहाला भेट

महिला बंदींच्या अडचणी जाणून घेतल्या

नांदेड| राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी रविवारी नांदेड जिल्हा कारागृहाला भेट देऊन महिला बंदींची प्रत्यक्ष भेट घेत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. महिला बंदींच्या पुनर्वसनासाठी कौशल्य विकास, मानसिक आरोग्य सेवा, कायदेशीर मदत आणि मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी विविध सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

यावेळी जिल्हा कारागृह अधीक्षक संपत आडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद देशपांडे, महिला व बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, महिला व बाल विकास अधिकारी गणेश वाघ, सहाय्यक अधीक्षक व्ही. एस. मेश्राम, दयावंत काळबांडे, सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा नरवडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

महिला बंदींशी संवाद साधताना विजया रहाटकर यांनी त्यांच्या वैयक्तिक अडचणी, कारागृहातील उपलब्ध सुविधा तसेच मोफत विधी सहाय्याबाबत माहिती घेतली. त्यानंतर कारागृह प्रशासन आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत महिला बंदींच्या मुलांसाठी कारागृह परिसरात अंगणवाडी सुरू करण्याची शक्यता, कौशल्य विकास प्रशिक्षण, ग्रंथालयाची स्थापना, स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून कलागुणांना प्रोत्साहन देणारे उपक्रम आणि नियमित समुपदेशन यावर चर्चा झाली.

महिला बंदींच्या मानसिक आरोग्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांकडून नियमित समुपदेशन उपलब्ध करून देण्यासोबतच सामाजिक कार्यकर्त्यांनी आठवड्यातून किमान दोन वेळा भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच योग, ध्यान, व्यक्तिमत्त्व विकास आणि सामाजिक-धार्मिक प्रबोधनाचे उपक्रम स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने राबविण्यावर त्यांनी भर दिला.

कारागृहातील पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्यासह महिला बंदींसाठी आवश्यक मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. भविष्यातील सुविधा विस्ताराच्या दृष्टीने कारागृहातील उपलब्ध जागेचीही त्यांनी पाहणी केली. भेटीदरम्यान त्यांनी कारागृहातील स्वयंपाकगृहाची पाहणी करून बंदींसाठी तयार होणाऱ्या भोजनाची माहिती घेतली. तसेच महिला बंदींना नातेवाईकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ई-मुलाखत घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या कक्षाची पाहणी करून त्याच्या कार्यपद्धतीची माहिती जाणून घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!