एकघरी बंधारा दुरुस्तीतील कथित गैरव्यवहाराची चौकशी करा; अन्यथा १५ जुलैपासून उपोषणाचा इशारा

जलसंधारण अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी; प्राजक्ता गुंडेकर यांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील मौजे एकघरी येथील बंधारा दुरुस्तीच्या कामात कथित आर्थिक गैरव्यवहार व निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप करत संबंधित जलसंधारण अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी युवती सेना जिल्हा समन्वयक तथा ग्रामपंचायत सदस्या प्राजक्ता रामराव गुंडेकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, एकघरी येथील बंधारा दुरुस्तीसाठी सुमारे ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात बंधाऱ्यावरील काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, शासनाच्या निधीचा अपव्यय झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. बांधाऱ्याची उंची वाढविण्यासाठी केवळ मतिमिश्रित पद्धतीने नियमांना बगल देऊन वरवरची कामे करून बंधाऱ्याची गुणवत्ता धोक्यात आनल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व संबंधित ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. कारण सदर कामावर संबंधित लघु पाठबंधारे अधिकारी यांनी साधी भेट देखील दिली नाही. एव्हढेच नाहीतर डोळेझाकून संबंधित कामाची देयके देण्यात आली.

या अनियमित कामाची चौकशी करावी अन्यथा १५ जुलै २०२६ पासून एकघरी बंधाऱ्यावर बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा प्राजक्ता गुंडेकर यांनी दिला आहे. या निवेदनाची प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड तसेच जलसंधारण अधिकारी (लघु पाटबंधारे विभाग), जिल्हा परिषद नांदेड यांनाही देण्यात आली आहे.

या संदर्भात अधिक माहिती घेतली असता बंधारा दुरुस्तीचे काम आणखी होने बाकी असून, कोणत्या प्रकारचे बिले अदा करण्यात आलेली नाहीत. अशी माहिती संबंधित ठेकेदाराकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!