मुंबईत पत्रकार किशोरकुमार वागदरीकर यांचा ‘स्वाभिमान लेखणी’ पुरस्काराने गौरव

निर्भीड, वस्तुनिष्ठ आणि जनहिताच्या पत्रकारितेची दखल; ‘टाईम्स न्यूज २४’च्या संपादकाचा मानाचा सन्मान
मुंबई/नांदेड, प्रतिनिधी| जनहिताच्या प्रश्नांवर निर्भीड, वस्तुनिष्ठ आणि सातत्यपूर्ण पत्रकारिता करणारे ‘टाईम्स न्यूज २४’ या वृत्तपोर्टलचे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार किशोरकुमार शिवाजीराव वागदरीकर यांना पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘स्वाभिमान लेखणी’ पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

आर्यारवी एंटरटेनमेंट यांच्या वतीने आयोजित ‘पहिला पत्रकार, मुक्त पत्रकार, संपादक, कला, साहित्य, समाजसेवक पुरस्कार सोहळा–२०२६’ अंतर्गत रविवारी (१२ जुलै) मुंबई येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर हॉल येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आयोजक, लेखक, अभिनेते, दिग्दर्शक व पत्रकार महेश्वर भिकाजी तेटांबे यांच्या हस्ते वागदरीकर यांचा गौरव करण्यात आला.

या सोहळ्यास श्रीधर कीर, विसुभाऊ बापट, अरुण म्हात्रे, पंढरीनाथ तामोरे, गुरुनाथ तिरपनकर, सुनील शिर्के, वैभव कदम, कृष्णा काजरोळकर, ॲड. गौरव पाटील, अतुल तोडकरी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

निर्भीड, निष्पक्ष आणि जनहिताच्या प्रश्नांवर सातत्याने प्रभावी वृत्तांकन केल्याबद्दल वागदरीकर यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून सामाजिक, प्रशासकीय आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडत त्यांनी विश्वासार्ह पत्रकार म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

‘टाईम्स न्यूज २४’ या वृत्तपोर्टल व युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून ते विविध लोकहिताच्या विषयांवर सातत्याने वृत्तांकन करत असून, त्यांच्या बातम्यांची दखल प्रशासनासह समाजातील विविध स्तरांवर घेतली जाते. यापूर्वीही त्यांच्या उल्लेखनीय पत्रकारितेची दखल घेत विविध प्रतिष्ठित संस्थांनी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविले आहे.

‘स्वाभिमान लेखणी’ पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याला आणखी एक मानाचा सन्मान लाभला असून, नांदेडच्या पत्रकारितेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या यशाबद्दल पत्रकार, सामाजिक, राजकीय, प्रशासकीय तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!