विष्णुपुरी उड्डाणपूल घटनेची उच्चस्तरीय चौकशी; दोषींवर कठोर कारवाई होणार – पालकमंत्री अतुल सावे

नांदेड| नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील विष्णुपुरी येथे श्री गुरुगोबिंदसिंहजी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील उड्डाणपुलाच्या बाजूचा खालचा भाग कोसळल्याच्या घटनेची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणाची उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीत बांधकामातील त्रुटी, निकृष्ट दर्जाचे साहित्य किंवा निष्काळजीपणा आढळल्यास जबाबदारांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली.

घटनेनंतर पालकमंत्री सावे यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत उड्डाणपुलाच्या संरचनात्मक स्थिरतेची तपासणी करून आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाला दिले. तसेच या घटनेच्या तांत्रिक चौकशीसाठी केंद्रीय तज्ज्ञांची टीम दिल्लीहून नांदेडला दाखल होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन उड्डाणपुलावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्याचे आदेश दिले. रस्त्यावर पडलेला मलबा जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात आला. प्रशासन, पोलीस आणि संबंधित विभागांनी समन्वयाने पर्यायी मार्गावर वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने कार्यवाही केली.

या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उड्डाणपुलाच्या संपूर्ण बांधकामाची सखोल तांत्रिक तपासणी करून त्याचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.

पालकमंत्री अतुल सावे यांनी स्पष्ट केले की, सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये दर्जाबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. चौकशी अहवालानुसार अधिकारी, कंत्राटदार किंवा संबंधित यंत्रणेकडून निष्काळजीपणा झाल्याचे सिद्ध झाल्यास त्यांच्याविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!