
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| राज्य शासनाच्या ‘राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन योजना २०२६-२७’ अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील वयोवृद्ध ज्येष्ठ कलावंत, शाहीर आणि लोकपारंपरिक कलाकारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.



इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी १ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत ‘आपले सरकार’ पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन मानधन निवड समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि समितीचे सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत विभाग) डी. बी. गिरी यांनी केले आहे.



या योजनेसाठी अर्जदाराचे वय ५० वर्षांपेक्षा अधिक असणे आवश्यक असून दिव्यांग कलाकारांसाठी ४० वर्षे वयोमर्यादा आहे. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न सर्व स्रोतांमधून ६० हजार रुपयांपर्यंत असावे. तसेच अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.


अर्जासोबत वयाचा दाखला, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, बाँड पेपरवरील प्रतिज्ञापत्र, इतर कोणत्याही शासकीय मानधन योजनेचा लाभ घेत नसल्याचे प्रमाणपत्र, पती-पत्नीचा संयुक्त फोटो, बँक पासबुक, दिव्यांग किंवा विधवा/परित्यक्ता असल्यास संबंधित प्रमाणपत्र, केंद्र शासनाचे पुरस्कार प्रमाणपत्र, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांचे शिफारसपत्र आदी आवश्यक कागदपत्रे जोडणे गरजेचे आहे.


आधार क्रमांकाशी मोबाईल क्रमांक व बँक खाते लिंक असणेही आवश्यक आहे. शासन निर्णयातील सर्व अटी व शर्ती लागू राहणार असून मुदत संपल्यानंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
नांदेड जिल्ह्यातील शाहीर, भारुडकार, गोंधळी, बहुरूपी, वासुदेव, पोतराज, पिंगळी, बंजारा लोकनाट्य कलाकार, नृत्य व नाट्यकलावंत, कवी, गायक, वादक, नंदीबैलवाले तसेच लोकसंस्कृती जपणाऱ्या सर्व ज्येष्ठ साहित्यिक व पारंपरिक कलावंतांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पारंपरिक शाहीर लोककला संवर्धन मंडळ, नांदेड जिल्हा महिला सचिव सौ. मीरा जाधव पाटील यांनी केले आहे.
