
नांदेड | वीरशैव लिंगायत समाजाला देशातील सातवा स्वतंत्र धर्म म्हणून संविधानिक मान्यता मिळावी, यासाठी व्यापक स्तरावर प्रयत्न सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केदारपीठाचे जगद्गुरू रावल विद्याविभूषित श्री श्री श्री १००८ भीमाशंकरलिंग महास्वामीजी यांनी दिली. या संदर्भात उदगीर येथे २ ऑगस्ट रोजी होणाऱ्या बैठकीत अंतिम भूमिका निश्चित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी शिष्टमंडळ पाठविण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.



नांदेडमधील आनंदनगर परिसरातील श्री केदारेश्वर सत्संग भवन येथे आयोजित व्यापक बैठकीत ते धर्मोपदेश करताना बोलत होते. या बैठकीस महाराष्ट्र व तेलंगणातील २५ हून अधिक मठाधिपती, भाजपचे कंधार तालुकाध्यक्ष बालाजी पांडागळे, पक्षाचे प्रवक्ते संतोष पांडागळे तसेच वीरशैव लिंगायत समाजातील मान्यवर उपस्थित होते.



जगद्गुरूंनी सांगितले की, वीरशैव लिंगायत समाजाची स्वतंत्र धार्मिक परंपरा, तत्त्वज्ञान आणि संस्कृती असून त्याचे पुरावे विविध धर्मग्रंथांमध्ये उपलब्ध आहेत. देशात लवकरच होणाऱ्या जातीनिहाय जनगणनेच्या पार्श्वभूमीवर वीरशैव लिंगायत धर्माला स्वतंत्र ओळख मिळावी, यासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे.


यासाठी कायदेतज्ज्ञ, धर्मगुरू, समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि अभ्यासक यांची २ ऑगस्ट रोजी उदगीर येथे व्यापक बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत पुढील भूमिका निश्चित करून एक प्रतिनिधीमंडळ तयार करण्यात येईल. हे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन वीरशैव लिंगायत धर्माला स्वतंत्र मान्यता देण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



बैठकीला नांदेड जिल्ह्यासह विविध भागांतील वीरशैव लिंगायत समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन राज्याचे माजी शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे यांनी केले.
