सिडकोतील रमामाता आंबेडकर चौकात जड वाहनांना प्रतिबंध; लोखंडी कमान पुन्हा कार्यान्वित

नवीन नांदेड | सिडको परिसरातील रमामाता आंबेडकर चौक (ढवळे कॉर्नर) येथे जड वाहनांच्या वाढत्या वर्दळीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. याची गंभीर दखल घेत ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या पुढाकारातून या ठिकाणी जड वाहनांना प्रतिबंध करण्यासाठी लोखंडी कमान पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहे.

नांदेड–उस्माननगर रोड, एमआयडीसी कॉर्नर ते रमामाता आंबेडकर चौक आणि पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावर ट्रक, टिपर, डंपरसह मोठ्या वाहनांची भरधाव वाहतूक होत होती. या मार्गावर मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि पादचारी ये-जा करत असल्याने अपघाताचा धोका वाढला होता.

यापूर्वी बसविण्यात आलेली लोखंडी कमान अज्ञात वाहनाने नुकसानग्रस्त केली होती. त्यामुळे पुन्हा जड वाहनांची वर्दळ वाढली होती. अखेर पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदार यांच्या समन्वयाने ८ जुलै रोजी नवीन लोखंडी कमान बसवून ती कार्यान्वित केली.

वाहनचालकांना कमान स्पष्टपणे दिसावी यासाठी त्यावर लाल रंगाचे रिफ्लेक्टिव्ह (रेडियम) पट्टे लावण्यात आले आहेत. या उपाययोजनेमुळे जड वाहनांचा प्रवेश रोखला जाणार असून परिसरातील नागरिक, शालेय विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत वाहतूक सुरक्षेसाठी प्रशासनाने उचललेल्या या पावलाचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!