हिमायतनगर सार्वजनिक बांधकाम उपविभागाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात?

निकृष्ट रस्ते, रखडलेली कामे आणि ‘अपडाऊन’ संस्कृतीवर संताप

हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, निकृष्ट दर्जाचे रस्ते, रखडलेली विकासकामे आणि अधिकाऱ्यांच्या कथित मुख्यालयाबाहेरील वास्तव्यासंदर्भात नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असल्याने या कामांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ते मंगरूळ मार्ग, हिमायतनगर ते बोरगडी रस्ता, डोल्हारी ते गांजेगाव मार्ग, सोनारी फाटा ते वाळकेवाडी–दूधड रस्ता, सवना ते वाशी, टेंभी, अंदेगांव, पवना, चिंचोर्डी ते दगडवाडी मार्ग तसेच अन्य अंतर्गत रस्त्यांची कामे अनेक ठिकाणी संथ गतीने सुरू आहेत. काही प्रकल्पांना तब्बल दोन वर्षे उलटूनही पूर्णत्व आलेले नाही. सिरंजणी, कोठा, सवना, आयटीआय ते सिरंजणी आदी भागांतील रस्त्यांचीही मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याचे नागरिक सांगत आहेत. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असून, अपघातांचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक ठिकाणी मंजूर अंदाजपत्रकानुसार काम न करता निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले. परिणामी, नव्याने तयार झालेले रस्ते काही महिन्यांतच उखडू लागले. यामुळे संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांच्या संगनमताची शंका उपस्थित केली जात आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी तातडीने दखल घेऊन तालुक्यात सुरू असलेल्या व पूर्ण झालेल्या रस्ते, पूल, शासकीय इमारती आणि सभागृहांच्या कामांची आधुनिक गुणवत्ता नियंत्रण यंत्रणेद्वारे (Quality Control Test) तपासणी करावी, अशी मागणी होत आहे. तपासणीत दोषी आढळणाऱ्या अधिकारी व ठेकेदारांवर शासकीय निधीचा गैरवापर, निकृष्ट कामे आणि जनतेची फसवणूक केल्याप्रकरणी कठोर प्रशासकीय व फौजदारी कारवाई करावी, अशीही नागरिकांची मागणी आहे.

‘मुख्यालयाची ॲलर्जी’चा आरोप – स्थानिक नागरिकांच्या आरोपानुसार, सार्वजनिक बांधकाम विभागातील अनेक अधिकारी व कर्मचारी मुख्यालयात न राहता नांदेड किंवा इतर ठिकाणांहून अपडाऊन करतात. काही कर्मचारी हिमायतनगर येथे नियुक्ती असतानाही अन्य ठिकाणी प्रतिनियुक्तीवर कार्यरत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. त्यामुळे विकासकामांवर प्रभावी देखरेख होत नसून, कामांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची चर्चा आहे. हिमायतनगर तालुक्यातील विकासकामांबाबत वाढत असलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वस्तुनिष्ठ चौकशी करून वास्तव समोर आणावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही त्यामुळे या संदर्भात त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!