पावसाने फिरवली पाठ; हिमायतनगरात खरीप धोक्यात, कृषी विभागाच्या भूमिकेवरही शेतकऱ्यांचा संताप

उगवलेली पिके करपू लागली; बोगस बियाण्यांच्या संशयाने शेतकरी हवालदिल

हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यात पावसाने अचानक दडी मारल्याने खरीप हंगाम संकटात सापडला असून, उगवलेली पिके करपू लागल्याने शेतकरी हतबल झाला आहे. गेल्या सात ते आठ दिवसांपासून समाधानकारक पाऊस नसल्यामुळे सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कापूस आणि हळद पिकांवर मोठे संकट ओढवले आहे. वेळेत पाऊस झाला नाही तर हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे आर्थिक संकट कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे.

मान्सूनच्या सुरुवातीला अनुकूल वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरणी केली. मात्र दोन-तीन दिवसांच्या हलक्या सरींनंतर पावसाने पाठ फिरवली. परिणामी जमिनीतील ओलावा संपत चालला असून, अनेक शेतांमध्ये उगवलेली रोपे करपू लागली आहेत. हलक्या जमिनीवरील पिकांची अवस्था सर्वाधिक गंभीर आहे. ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण असून, अनेक ठिकाणी शेतकरी पावसासाठी देवळांत पंगती घालत आहेत. लहान मुले “धोंडी धोंडी पाणी दे… साई माई पिकू दे…” अशी पारंपरिक हाक देत पावसासाठी प्रार्थना करत असल्याचे भावनिक चित्र पाहायला मिळत आहे.

कृषी विभागावरही शेतकऱ्यांचा रोष

यंदाच्या खरीप हंगामापूर्वी तालुका कृषी विभागाने व्यापक पेरणीपूर्व मार्गदर्शन न केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. काही निवडक शेतकऱ्यांसोबत कार्यक्रम करून केवळ औपचारिकता पूर्ण करण्यात आली, मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत आवश्यक मार्गदर्शन पोहोचले नाही, अशी भावना व्यक्त होत आहे. त्यातच अनेक शेतकऱ्यांनी महागडे बियाणे खरेदी करूनही उगवण न झाल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे बोगस बियाण्यांचा पुरवठा झाला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बियाण्यांचे नमुने घेतले; अहवाल मात्र अद्याप गुलदस्त्यात

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कृषी विभागाने हिमायतनगर शहरातील बियाणे विक्रेत्याकडून नमुने तपासणीसाठी घेतले. मात्र अद्याप तपासणी अहवाल जाहीर करण्यात आलेला नाही. दरम्यान, अनेक शेतकऱ्यांना पहिल्याच पावसावर पेरणी करावी लागली. आता बियाण्यांची उगवण न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि संताप वाढला आहे. काही शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप केला आहे.

खरीप हंगामातील नियोजन, पेरणीपूर्व मार्गदर्शन, बियाण्यांची गुणवत्ता आणि शेतकऱ्यांच्या तक्रारी हाताळण्यात हिमायतनगर तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून झालेल्या कथित हलगर्जीपणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. या बाबत तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!