‘स्वाभिमान लेखणी’ पुरस्कारासाठी पत्रकार किशोरकुमार वागदरीकर यांची निवड

१२ जुलै रोजी मुंबईत होणार सन्मान; नांदेडच्या पत्रकारितेला आणखी एक मानाचा बहुमान
नांदेड, अनिल मादसवार| पत्रकारितेतील निर्भीड, वस्तुनिष्ठ आणि जनहिताच्या प्रश्नांवरील सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत टाईम्स न्यूज २४ या वृत्तपोर्टलचे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार किशोरकुमार शिवाजीराव वागदरीकर यांची प्रतिष्ठेच्या ‘स्वाभिमान लेखणी’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. ही घोषणा आयोजक, लेखक, अभिनेता, दिग्दर्शक व पत्रकार महेश्वर भिकाजी तेटांबे यांनी केली.

आर्यारवी एंटरटेनमेंट यांच्या वतीने आयोजित ‘पत्रकार, मुक्त पत्रकार, संपादक, कला, साहित्य, समाजसेवक पुरस्कार सोहळा-२०२६’ या कार्यक्रमात १२ जुलै रोजी मुंबई येथे वागदरीकर यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक, प्रशासकीय आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडत त्यांनी पत्रकारितेत स्वतंत्र, विश्वासार्ह आणि जनाभिमुख अशी ओळख निर्माण केली आहे. जनहिताच्या मुद्द्यांवर निर्भीडपणे वृत्तांकन केल्यामुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

किशोरकुमार वागदरीकर यांनी आपल्या पत्रकारिता कारकिर्दीत दैनिक सकाळ, दैनिक भास्कर, दैनिक देशोन्नती तसेच दैनिक लोकमंच क्रांती या वृत्तपत्रांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. सध्या ते ‘टाईम्स न्यूज २४’ या वृत्तपोर्टल व युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून प्रभावी पत्रकारिता करत आहेत.

यापूर्वीही त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत विविध प्रतिष्ठित संस्थांनी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविले आहे. ‘स्वाभिमान लेखणी’ पुरस्कारामुळे त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, नांदेडच्या पत्रकारिता क्षेत्रासाठी हा अभिमानाचा क्षण मानला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!