
हदगाव-हिमायतनगरच्या हितासाठी विधानमंडळात बुलंद आवाज
हदगाव/हिमायतनगर/नांदेड /मुंबई| हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यांचा प्रस्तावित किनवट जिल्ह्यात समावेश करण्यास आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी विधानमंडळात ठाम विरोध दर्शवत मतदारसंघाच्या हिताची जोरदार बाजू मांडली. दोन्ही तालुके किनवट जिल्ह्यात समाविष्ट झाल्यास नागरिकांवर अन्याय होईल आणि प्रशासनापर्यंत पोहोचणे अधिक कठीण होईल, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.



राज्यात नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीबाबत चर्चा सुरू असताना किनवटला जिल्ह्याचा दर्जा देण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. मात्र, हदगाव आणि हिमायतनगर हे दोन्ही तालुके नांदेड जिल्ह्याशी भौगोलिक, प्रशासकीय आणि सामाजिकदृष्ट्या अधिक निगडित असल्याचे आमदार कोहळीकर यांनी सभागृहात नमूद केले.



त्यांनी सांगितले की, मतदारसंघातील अनेक गावे आधीच दुर्गम भागात आहेत. अशा परिस्थितीत प्रशासकीय सीमा बदलल्यास नागरिकांना शासकीय कार्यालयांपर्यंत पोहोचण्यासाठी अधिक अंतर कापावे लागेल. त्यामुळे शासकीय सेवा, महसूल, आरोग्य आणि इतर अत्यावश्यक सुविधांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.


आमदार कोहळीकर यांनी सरकारला हदगाव आणि हिमायतनगर तालुके नांदेड जिल्ह्यातच कायम ठेवण्याची मागणी केली. नागरिकांच्या हिताविरुद्ध कोणताही निर्णय घेऊ नये, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी विधानमंडळात नोंदवली.


दरम्यान, या विषयावर विविध स्तरांवर चर्चा सुरू असून, सरकार अंतिम निर्णय घेण्यापूर्वी स्थानिक जनभावना आणि प्रशासकीय व्यवहार्यता लक्षात घेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
“हदगाव आणि हिमायतनगरच्या जनतेने चिंता करू नये. राज्याच्या भौगोलिक परिस्थितीचा व लोकभावनांचा आदर करूनच निर्णय घेतला जाईल. जनतेच्या इच्छेविरुद्ध कोणताही निर्णय होणार नाही; सर्व काही तुमच्या इच्छेप्रमाणेच होईल.”— ना. चंद्रशेखर बावनकुळे
