
जीवितहानी नाही, नागरिकांनी सतर्क राहावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
नांदेड | हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यात गुरुवार, 9 जुलै 2026 रोजी मध्यरात्री भूकंपाचे सलग तीन सौम्य धक्के जाणवल्याची माहिती जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्राने दिली आहे. या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही.



अधिकृत माहितीनुसार, रात्री 1.37, 2.15 आणि 2.17 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंप नोंदीनुसार या धक्क्यांची तीव्रता अनुक्रमे 4.6, 3.6 आणि 3.9 रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील शिरली गाव परिसरात असल्याचे अधिकृत वृत्तात नमूद करण्यात आले आहे.




जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. भूकंपाची पूर्वकल्पना देणे शक्य नसल्याने नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे त्यांनी सांगितले.


भूकंपाचे धक्के जाणवल्यास तात्काळ घराबाहेर पडून मोकळ्या जागेत जावे, लिफ्टचा वापर टाळावा आणि प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.


जिल्हा प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
