
नांदेड | सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, हा संदेश देत पतंजली योग परिवाराच्या वतीने नांदेड शहरातील नाईक नगर परिसरातील उद्यानात विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले.



या उपक्रमात उद्यान परिसरातील प्लास्टिक कचरा, रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, स्नॅक्स व गुटख्याची पाकिटे, खराब चप्पल, कपड्यांचे तुकडे तसेच अन्य टाकाऊ वस्तू गोळा करून त्यांची घंटागाडीमार्फत योग्य विल्हेवाट लावण्यात आली.



नाईक नगर परिसरातील हे उद्यान ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक-युवती आणि लहान मुलांसाठी फिरणे, व्यायाम करणे तसेच उद्यानातील मंदिरात दर्शनासाठी महत्त्वाचे ठिकाण आहे. मात्र काही नागरिकांकडून निष्काळजीपणे कचरा टाकला जात असल्याने परिसर अस्वच्छ होत असल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली.


यावेळी पतंजली योग समितीचे राज्य प्रभारी अनिल अमृतवार म्हणाले, “दुसऱ्याने टाकलेला कचरा उचलणे म्हणजे स्वच्छता अभियान नव्हे; तर स्वतः कचरा न करणे आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे, हीच खरी स्वच्छतेची संस्कृती आहे. प्रत्येक नागरिकाने सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करत स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारली पाहिजे.”


या स्वच्छता अभियानात सदाशिव बुटले पाटील, देवेश सलगर, अनिल कदम, श्रीराम मोरे, जितेंद्र सांगवीकर, मल्लिकार्जुन कामटेकर यांच्यासह पतंजली योग परिवाराचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक शहर घडविण्यासाठी अशा जनजागृतीपर उपक्रमांची आवश्यकता असून, प्रत्येक नागरिकाने स्वच्छतेचा संकल्प करून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
