लोहा शहराच्या शांततेला गोळीबाराचे गालबोट; वाढती नशाबाजी, टवाळखोरांचे टोळके आणि पालकांसमोर नवे आव्हान

लोहा| लोहा शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात सोमवारी रात्री घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने शहराच्या शांततेला गालबोट लागले आहे. पती-पत्नीतील वादातून एका तरुणाने अवैधरित्या मिळवलेल्या गावठी पिस्तुलातून पत्नीवर गोळीबार केल्याची घटना घडली. लोह्याच्या इतिहासात अशा प्रकारची ही पहिलीच घटना मानली जात असून, वाढती नशाबाजी, तरुणांमधील बेशिस्त वर्तन आणि सामाजिक सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

शैक्षणिक, वैद्यकीय आणि व्यापारी केंद्र म्हणून लोहा शहराचा झपाट्याने विकास होत आहे. मात्र, या घटनेमुळे शहराच्या सुरक्षित प्रतिमेला धक्का बसला आहे. शाळा, महाविद्यालये आणि शिकवण्या सुटल्यानंतर मुलींचा पाठलाग करणाऱ्या टवाळखोरांच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबविण्याची गरज असून, पालकांनीही आपल्या पाल्यांच्या हालचालींकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

६ जुलै रोजी घडलेल्या या प्रकरणातील आरोपी विशाल सुरेश जाधव याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. दीड वर्षांपूर्वी पेट्रोलपंपावरील रक्कम घेऊन जाणारी बॅग लंपास केल्याचा गुन्हाही त्याच्यावर असल्याचे सांगितले जाते. कौटुंबिक वादातून त्याने पत्नीवर तीन गोळ्या झाडल्या असून, ती गंभीर जखमी झाली आहे.

तरुणाईत वाढते नशेचे प्रमाण – लोहा शहरात व्हाईटनर, गांजा आणि अन्य अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या तरुणांची संख्या वाढत असल्याची चर्चा आहे. संबंधित आरोपीही सातत्याने नशेच्या आहारी गेला होता, अशी चर्चा शहरात सुरू आहे. शहरातील काही भागांत अमली पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. विशेषतः बसस्थानक परिसरात नशेचे सेवन करणाऱ्यांचा वावर वाढल्याचे दिसून येत आहे. सामाजिक जाणकारांच्या मते, मद्यधुंद व्यक्तीपेक्षा अमली पदार्थांच्या प्रभावाखाली असलेली व्यक्ती गंभीर गुन्हा करण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे गांजा व इतर अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

शाळा-महाविद्यालय परिसरात टवाळखोरांचा वावर – शाळा, महाविद्यालये आणि शिकवण्या सुटल्यानंतर अनेक तरुण रस्त्यावर व परिसरात थांबत असल्याचे दिसून येते. मुलींचा पाठलाग करणे, त्यांना त्रास देणे आणि सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे अशा प्रकारांमुळे पालक आणि विद्यार्थिनींमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. पोलिसांनी अशा ठिकाणी नियमित गस्त वाढवून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

बसस्थानक परिसरात शाळकरी विद्यार्थ्यांची हाणामारी – ग्रामीण भागातून शिक्षणासाठी दररोज एसटीने लोह्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये बसस्थानक परिसरात किरकोळ वाद, हाणामाऱ्या आणि गटबाजीच्या घटना वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या प्रकारांमुळे पुढे टोळ्या तयार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पोलिसांची गस्त आणि पालकांची जबाबदारी महत्त्वाची – लोहा शहरातील गोळीबाराची घटना ही वाढत्या गुन्हेगारीचे इशारे देणारी मानली जात आहे. शाळा, महाविद्यालये आणि शिकवण्या सुटण्याच्या वेळेत संवेदनशील भागांत पोलिसांनी नियमित गस्त वाढविणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पालकांनीही आपल्या पाल्यांच्या मित्रपरिवार, हालचाली आणि सवयींकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. शहराचा विकास जितक्या वेगाने होत आहे, तितक्याच प्रभावीपणे कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस, पालक आणि नागरिक यांचे संयुक्त प्रयत्न आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!