
नांदेड | मराठवाड्यातील प्रवाशांसाठी दक्षिण मध्य रेल्वेने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन हुजूर साहिब नांदेड–लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) दरम्यान दोन नवीन साप्ताहिक रेल्वेगाड्या सुरू करण्यात येणार असून, या सेवेमुळे नांदेडसह पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला आदी भागातील प्रवाशांना मुंबईकडे अधिक सोयीस्कर रेल्वे सेवा उपलब्ध होणार आहे.



रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 17667 ही रेल्वे प्रत्येक बुधवारी रात्री 9.15 वाजता नांदेड येथून सुटून पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला आणि मनमाड मार्गे गुरुवारी दुपारी 1 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या गाडीची नियमित सेवा 8 जुलै 2026 पासून सुरू होणार आहे.



तर गाडी क्रमांक 17668 ही रेल्वे प्रत्येक गुरुवारी सायंकाळी 4.55 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटून मनमाड, अकोला, वाशिम, हिंगोली, बसमत आणि पूर्णा मार्गे शुक्रवारी सकाळी 9.10 वाजता नांदेड येथे पोहोचेल. या सेवेची सुरुवात 9 जुलै 2026 पासून होईल.


याशिवाय गाडी क्रमांक 17665 ही रेल्वे प्रत्येक सोमवारी रात्री 9.15 वाजता नांदेड येथून सुटून मंगळवारी दुपारी 1.40 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. ही सेवा 13 जुलै 2026 पासून सुरू होणार आहे.


तर गाडी क्रमांक 17666 ही रेल्वे प्रत्येक मंगळवारी सायंकाळी 4.35 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटून बुधवारी सकाळी 9.10 वाजता नांदेड येथे दाखल होईल. या गाडीची नियमित सेवा 14 जुलै 2026 पासून सुरू करण्यात येणार आहे.
या दोन्ही साप्ताहिक गाड्यांना पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, भुसावळ, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी आणि कल्याण या स्थानकांवर दोन्ही दिशेने थांबा देण्यात आला आहे.
या गाड्यांसाठीचे आरक्षण पीआरएस आरक्षण केंद्र तसेच आयआरसीटीसीच्या ऑनलाइन प्रणालीद्वारे उपलब्ध असून, प्रवाशांनी या नवीन रेल्वे सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयाने केले आहे.
