
नांदेड, अनिल मादसवार| दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात रेल्वे विकासकामांना वेग देण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुविधांबाबत लोकप्रतिनिधींच्या सूचना जाणून घेण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजय कुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी नांदेड येथे खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत महाराष्ट्रातील रेल्वे पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून ₹23,926 कोटींची विक्रमी तरतूद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.



नांदेड येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयातील (रेल विकास सदन) परिषद सभागृहात झालेल्या या बैठकीला महाराष्ट्रातील १२ खासदार, नांदेडचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले, सिकंदराबाद विभागाचे डीआरएम डॉ. आर. गोपालकृष्णन, हैदराबाद विभागाचे डीआरएम संतोष कुमार वर्मा तसेच दक्षिण मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.



महाव्यवस्थापक संजय कुमार श्रीवास्तव यांनी रेल्वेच्या प्रवासी सुविधा, नवीन रेल्वेगाड्यांची सुरूवात, विशेष गाड्या, अतिरिक्त डबे, स्थानकांवरील स्वच्छता आणि पायाभूत सुविधांच्या विकासाबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, गेल्या १२ वर्षांत महाराष्ट्रातील दक्षिण मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रात २० नवीन रेल्वे सेवा सुरू करण्यात आल्या असून, त्यामध्ये नांदेड–सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस आणि नागपूर–सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस या महत्त्वाच्या गाड्यांचा समावेश आहे.


याशिवाय, १०६ मानवयुक्त रेल्वे फाटकांचे उच्चाटन, २० रेल्वे उड्डाणपूल (RoB) आणि १२१ रेल्वे भुयारी मार्ग (RuB) उभारण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


याच दिवशी नांदेड–मुंबई आणि टनकपूर–नांदेड या दोन नवीन रेल्वे सेवांना हिरवा झेंडा दाखविण्यात आल्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, या गाड्यांमुळे मराठवाडा आणि विदर्भाचा उत्तर व पश्चिम भारताशी रेल्वे संपर्क अधिक मजबूत होणार आहे.

बैठकीत उपस्थित खासदारांनी आपल्या मतदारसंघांतील रेल्वे विकासाशी संबंधित विविध प्रश्न मांडले. नवीन रेल्वेगाड्या, अतिरिक्त थांबे, अतिरिक्त डबे, प्रवासी सुविधांमध्ये वाढ, रेल्वे उड्डाणपूल, भुयारी मार्ग आणि प्रलंबित रेल्वे प्रकल्पांना गती देण्याबाबत त्यांनी मागण्या केल्या.
बैठकीच्या समारोपावेळी महाव्यवस्थापक संजय कुमार श्रीवास्तव यांनी खासदारांनी दिलेल्या सूचना आणि मार्गदर्शनाची दखल घेत त्यांच्या मागण्यांना प्राधान्य देऊन आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.
