नांदेड–मुंबई प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; एलटीटीदरम्यान दोन साप्ताहिक रेल्वेगाड्या सुरू

नांदेड | नांदेड आणि मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दक्षिण मध्य रेल्वेने मोठा दिलासा दिला आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन हजूर साहिब नांदेड–लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) दरम्यान दोन साप्ताहिक रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गाडी क्र. 17667 हजूर साहिब नांदेड–एलटीटी ही गाडी प्रत्येक बुधवारी रात्री 9.15 वाजता नांदेड येथून सुटून बसमत, हिंगोली, वाशीम, अकोला, मनमाड मार्गे गुरुवारी दुपारी 1 वाजता एलटीटी येथे पोहोचेल. या गाडीची नियमित सेवा 8 जुलै 2026 पासून सुरू होणार आहे.

परतीच्या प्रवासासाठी गाडी क्र. 17668 प्रत्येक गुरुवारी सायंकाळी 4.55 वाजता एलटीटी येथून सुटून मनमाड, अकोला, वाशीम, हिंगोली, बसमत मार्गे शुक्रवारी सकाळी 9.10 वाजता नांदेडला पोहोचेल. ही सेवा 9 जुलै 2026 पासून सुरू होईल.

याशिवाय गाडी क्र. 17665 प्रत्येक सोमवारी रात्री 9.15 वाजता नांदेडहून सुटून मंगळवारी दुपारी 1.40 वाजता एलटीटीला पोहोचेल. या गाडीची सेवा 13 जुलै 2026 पासून सुरू होणार आहे.
तर गाडी क्र. 17666 प्रत्येक मंगळवारी सायंकाळी 4.35 वाजता एलटीटीहून सुटून बुधवारी सकाळी 9.10 वाजता नांदेडला पोहोचेल. ही सेवा 14 जुलै 2026 पासून सुरू होणार आहे.

या गाड्यांना पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशीम, अकोला, मलकापूर, भुसावळ, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी आणि कल्याण या स्थानकांवर दोन्ही दिशांनी थांबा देण्यात आला आहे.

या गाड्यांसाठीचे आरक्षण पीआरएस आरक्षण केंद्रे तसेच आयआरसीटीसीच्या ऑनलाइन संकेतस्थळावर उपलब्ध असून, प्रवाशांनी या नवीन रेल्वे सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!