
नांदेड | बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी बालसाहित्य हे प्रभावी माध्यम असून, उत्तम बालसाहित्यामुळे मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळते, विचारप्रक्रिया विकसित होते आणि जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध बालसाहित्यकार, शिक्षणतज्ज्ञ तथा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते डॉ. सुरेश सावंत यांनी केले.



उदगीर येथील अहिल्यादेवी गार्डन सभागृहात माजी गटशिक्षणाधिकारी बालाजी बिरादार लिखित ‘बोलका ढोल’ आणि ‘मॅडम मॅडम शाळा सोडा’ या दोन बालसाहित्य पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेखिका तथा माजी प्राचार्या सौ. मैनाताई साबणे होत्या.



डॉ. सावंत म्हणाले की, बालसाहित्य वाचनामुळे मुलांमध्ये अनुभव आणि कल्पनाशक्तीचा विकास होतो. त्यांची विनोदबुद्धी, मानसिक क्षमता आणि आत्मविश्वास वृद्धिंगत होतो. घटना-घडामोडींना संवेदनशीलपणे प्रतिसाद देण्याची दृष्टीही बालसाहित्यातून मिळते. त्यामुळे दर्जेदार बालसाहित्य निर्मिती ही काळाची गरज असून, बालाजी बिरादार यांचे लेखन बालकांच्या जडणघडणीसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


कार्यक्रमाच्या प्रारंभी सौ. तोंडचिरकर आणि कु. अवनी स्वामी यांनी स्वागतगीत सादर केले. त्यानंतर डॉ. सुरेश सावंत यांच्या हस्ते दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक मुरलीधर जाधव यांनी केले, तर लेखक बालाजी बिरादार यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर अनंत कदम, डॉ. सुरेश सावंत आणि सौ. मैनाताई साबणे यांनी दोन्ही पुस्तकांचे सविस्तर परीक्षण केले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुळशीदास बिरादार यांनी केले, तर माजी प्राचार्य मोहनराव निडवंचे यांनी उपस्थितांचे आभार मानले. बालसाहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाची जोपासना करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
