संस्कार आणि संस्कृती जपणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव; पंढरपूर पायी वारीसाठी विजय चव्हाण यांचा सत्कार

नांदेड | भारतीय संस्कृती, वारकरी परंपरा आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाचा संदेश देणारा प्रेरणादायी उपक्रम गुजराती हायस्कूल, नांदेड येथे पार पडला. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर पायी वारीसाठी प्रस्थान करणारे शाळेचे वरिष्ठ लिपिक विजय चव्हाण यांचा शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

यावेळी मुख्याध्यापक आर. एस. सुमठाणकर यांनी भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि संस्कारांचे महत्त्व अधोरेखित करत शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये रुजविणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. शिक्षक व कर्मचारी स्वतःच्या आचरणातून संस्कृतीचे संवाहक बनले, तर विद्यार्थ्यांमध्येही चांगले संस्कार आपोआप रुजतात, असे ते म्हणाले.

शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित नसून सामाजिक बांधिलकी, परंपरा आणि अध्यात्म यांची जोपासना देखील तितकीच महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा विधायक उपक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांचा गौरव करणे ही संस्थेची जबाबदारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी विजय चव्हाण यांना शाल, पुष्पगुच्छ व शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या पंढरपूर पायी वारीचा संकल्प यशस्वी होवो तसेच विठ्ठल-रुक्मिणीचे आशीर्वाद लाभावेत, अशा शुभेच्छा उपस्थितांनी व्यक्त केल्या.

कार्यक्रमाच्या शेवटी “ज्ञानोबा-तुकाराम” आणि “माऊली… माऊली…” या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला. हा कार्यक्रम केवळ सत्कार सोहळा न ठरता भारतीय संस्कृती, वारकरी परंपरा आणि संस्कारक्षम शिक्षणाचा गौरव करणारा प्रेरणादायी उपक्रम ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!