हिमायतनगरात ‘पैसे दिल्याशिवाय काम होत नाही?’ सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया

ग्रामपंचायतींतील विकासकामांच्या चौकशीची मागणी; निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

हिमायतनगर | हिमायतनगर तालुक्यातील शासकीय कार्यालयांमध्ये पैसे दिल्याशिवाय कोणतेही काम होत नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत असून, या पार्श्वभूमीवर तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींतील प्रलंबित प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी पंचायत समिती, हिमायतनगर येथे निवेदन सादर करत गटविकास अधिकाऱ्यांकडे चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

या निवेदनामध्ये टाकराळाटाकराळा (बु.) व वडगाव (खु.) गट ग्रामपंचायतीसह तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींतील प्रधानमंत्री आवास (घरकुल) योजना, विहीर व सिंचन प्रकरणे, १४ वा व १५ वा वित्त आयोग निधी, ग्रामपंचायत विकासकामे, शेड, रस्ते, गटारे, पाणीपुरवठा, विविध शासकीय योजना मध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करून प्रलंबित बिले आणि लाभार्थ्यांच्या समस्यांचा आढावा मांडण्यात आला आहे.

वामनराव वडगावकर यांनी सांगितले की, ही भूमिका कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून जनहित, विकास आणि प्रशासनातील पारदर्शकता यासाठी आहे. शासनाचा निधी नियमानुसार आणि योग्य पद्धतीने खर्च होत आहे का, याचा जाब प्रशासनाकडे विचारणे हे लोकप्रतिनिधी म्हणून आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
टाकराळा गटासह तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचा सर्वांगीण विकास व्हावा, सार्वजनिक निधीचा पारदर्शक हिशेब नागरिकांसमोर यावा आणि ज्या ठिकाणी अनियमितता आढळेल तेथे निष्पक्ष चौकशी करून दोषींवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी.

शासकीय कार्यालयांमध्ये सर्वसामान्य नागरिकांची कामे रखडत असून काही ठिकाणी आर्थिक व्यवहाराशिवाय कामे होत नसल्याच्या तक्रारी सामाजिक माध्यमांवरही समोर येत असल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मागण्यांवर तातडीने निर्णय न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) आणि तहसीलदार यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!