जुलैअखेरपर्यंत ४० हजारांहून अधिक अपूर्ण घरकुले पूर्ण करा; सीईओ महेश पाटील यांचे आदेश

प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामांना गती देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना
नांदेड | प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत तिसरा हप्ता वितरित झालेल्या ४० हजार ७५३ अपूर्ण घरकुलांचे बांधकाम जुलैअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, त्यासाठी सर्व गट विकास अधिकाऱ्यांनी विशेष मोहीम राबवावी, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी दिले.

जिल्हा परिषदेत आयोजित तालुकानिहाय आढावा बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) तसेच विविध राज्य पुरस्कृत आवास योजनांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, सर्व विभागप्रमुख आणि जिल्ह्यातील गट विकास अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत ग्रामीण गृहनिर्माण अभियंता निहाय लाभार्थ्यांची यादी तयार करून प्रत्येक अपूर्ण घरकुलाचे नियोजनबद्ध पद्धतीने काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. लाभार्थ्यांशी सातत्याने संपर्क ठेवून ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करत प्रलंबित कामांना गती द्यावी, असेही महेश पाटील यांनी स्पष्ट केले.

याशिवाय प्रलंबित घरकुलांचे वर्गीकरण, पात्र लाभार्थ्यांना वेळेत निधी वितरण, पूर्ण झालेल्या घरकुलांना सौर ऊर्जा सुविधेचा लाभ, रमाई, शबरी व मोदी आवास योजनांतील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा, मनरेगाच्या समन्वयातून घरकुलांची कामे पूर्ण करणे तसेच आवास प्लस सर्वे-२०२४ आणि पीएम जनमन योजनेतील प्रलंबित बाबी तातडीने निकाली काढण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.

जिल्ह्यातील एकही पात्र लाभार्थी घरकुलापासून वंचित राहू नये आणि सर्व प्रलंबित कामे वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी प्रशासनाने अधिक प्रभावी नियोजन करून काम करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!