
नांदेड| केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नांदेड–मुंबई आणि टनकपूर–नांदेड या दोन नवीन एक्सप्रेस रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. याचवेळी टनकपूर–पिलीभीत रेल्वे सेवेचा विस्तार शाहजहानपूर पर्यंत करण्यात आला.



या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आणि पुष्कर सिंह धामी यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे सहभाग घेतला. नांदेड, टनकपूर आणि पिलीभीत रेल्वे स्थानकांवर विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.



यावेळी बोलताना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, टनकपूर–नांदेड एक्सप्रेसमुळे तख्त सचखंड श्री हजूर साहिब येथे येणाऱ्या भाविकांना मोठी सुविधा मिळणार आहे. तसेच नांदेड–मुंबई एक्सप्रेसमुळे मराठवाड्यातील वाशीम, हिंगोली, बसमत आदी भागातील प्रवाशांना मुंबईशी थेट आणि सुलभ रेल्वे संपर्क उपलब्ध होणार आहे.


त्यांनी भारतीय रेल्वेच्या प्रगतीचा आढावा घेताना गेल्या १२ वर्षांत ३७ हजार किलोमीटरहून अधिक नवीन रेल्वेमार्ग उभारण्यात आल्याचे आणि रेल्वे जाळ्याचे ९९.६ टक्के विद्युतीकरण पूर्ण झाल्याचे सांगितले. तसेच बुलेट ट्रेन आणि समर्पित मालवाहतूक मार्गांच्या कामांनाही वेग आला असल्याचे त्यांनी नमूद केले.



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही रेल्वे सेवांमुळे मराठवाडा आणि मुंबई तसेच उत्तराखंड व महाराष्ट्र यांच्यातील संपर्क अधिक मजबूत होणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही या सेवेमुळे पर्यटन, धार्मिक प्रवास आणि विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. नांदेड रेल्वे स्थानकावरील कार्यक्रमास अशोकराव चव्हाण, अजित गोपछडे, रवींद्र चव्हाण, महापौर कविता मुळे तसेच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
खासदार अशोकराव चव्हाण यांनी या नवीन रेल्वे सेवांमुळे नांदेड आणि मराठवाड्याचा देशातील प्रमुख शहरांशी रेल्वे संपर्क अधिक बळकट होईल, असे सांगितले. तर महापौर कविता मुळे यांनी विद्यार्थी, भाविक आणि व्यावसायिकांसाठी ही सेवा विशेष लाभदायक ठरणार असल्याचे नमूद केले.
