अमरनाथ गुहेतून – भाग ५  (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

“धरतीवरील स्वर्ग…आणि स्वर्गालाहीअस्वस्थ करणारी वास्तवाची चाहूल!”

वंदे भारतचा हवाहवासा वाटणारा प्रवास संपला आणि संध्याकाळच्या सुमारास आम्ही श्रीनगर रेल्वे स्थानकावर उतरलो. रेल्वेच्या वातानुकूलित डब्यातील सुखद प्रवास मागे पडला होता आणि आता आम्ही हिमालयाच्या कुशीत, बाबा बर्फानींच्या दर्शनाच्या उंबरठ्यावर उभे होतो.स्टेशनवर माझे जुने सहकारी आणि टूर ऑपरेटर सज्जादभाई स्वतः आम्हाला घेण्यासाठी आले होते. गेली अनेक वर्षे यात्रेच्या आयोजनात ते आमचे विश्वासू साथीदार आहेत. चेहऱ्यावर नेहमीचे हसू, पण डोळ्यांत मात्र काश्मीरच्या परिस्थितीची जाणीव स्पष्ट दिसत होती.

यावर्षी एक महत्त्वाचा निर्णय आम्ही आधीच घेतला होता. मोठ्या लक्झरी बसेस न करता वीस आसनी पाच मिनी बसेस केल्या. कारण स्पष्ट होते. मोठ्या वाहनांना सुरक्षा तपासणीसाठी वारंवार अडवले जात होते. प्रत्येक नाक्यावर तपासणी, चौकशी, कागदपत्रांची पडताळणी… आणि त्यामुळे वेळेचा मोठा अपव्यय होत होता.अनेक ठिकाणी मोठ्या बसेसना नो इंट्री होती. लहान बसेस मात्र तुलनेने सहज पुढे सरकत होत्या. यात्रेत व्यवस्थापन म्हणजे केवळ हॉटेल बुकिंग किंवा जेवण नव्हे; तर अशा छोट्या निर्णयांमुळेच संपूर्ण प्रवास सुरळीत होतो.पाच गटांमध्ये विभागलेला आमचा ताफा श्रीनगरच्या रस्त्यांवरून हॉटेलच्या दिशेने निघाला. दोन्ही बाजूंना उभे असलेले उंच चिनार वृक्ष, दूरवर दिसणारी हिमाच्छादित शिखरे, अधूनमधून वाहणारे थंडगार वारे आणि प्रत्येक चौकात तैनात असलेले सुरक्षा दल… निसर्ग आणि सुरक्षा यांचा हा विलक्षण संगम फक्त काश्मीरमध्येच अनुभवायला मिळतो.

आमच्या मुक्कामाची व्यवस्था हॉटेल मालाबार आणि हॉटेल काश्मीर येथे केली होती. सर्व यात्रेकरूंना त्यांच्या रूमचे वाटप करून थोडी विश्रांती घेण्यास सांगितले. पण यात्रेचा आयोजक विश्रांती घेत नाही; त्याची खरी धावपळ तर आता सुरू होते. रात्री आठ वाजता सर्वांची ग्रुप मीटिंग घेतली. उद्यापासून प्रत्यक्ष यात्रेचा प्रारंभ होणार होता. त्यामुळे प्रत्येकाला दोन दिवसांचे आवश्यक सामान वेगळे ठेवण्याच्या सूचना दिल्या. उर्वरित सामान हॉटेलमध्ये सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था केली. अनावश्यक वजन घेऊन डोंगर चढण्यात काहीच शहाणपण नसते.

यानंतर सर्वांत महत्त्वाचे काम झाले—यात्रा परची प्रत्येक यात्रेकरूच्या हातात दिली. मी सर्वांना थोड्या मिश्किल पण ठाम शब्दांत सांगितले— “ही परची म्हणजे तुमच्या यात्रेचा पासपोर्ट आहे. ती हरवली तर इथूनच बाबा बर्फानींचे दर्शन घ्यावे लागेल!”सगळ्यांनी हसत हसत परच्या आपल्या बॅगेत, पाकिटात आणि काहींनी तर मोबाईलच्या कव्हरमध्येही सुरक्षित ठेवल्या.यानंतर यात्रेच्या पुढील टप्प्याबाबत सविस्तर सूचना दिल्या. सकाळी वेळेत तयार राहणे, आय-कार्ड कायम गळ्यात ठेवणे, रेनकोट, गरम कपडे, औषधे, पाण्याची बाटली आणि आवश्यक सामान स्वतंत्र बॅगेत ठेवणे, कोणत्याही परिस्थितीत एकट्याने न फिरणे, सुरक्षा दलांच्या सूचनांचे अक्षरशः पालन करणे, अफवांवर विश्वास न ठेवणे आणि ग्रुपपासून दूर न जाणे—या प्रत्येक सूचना पुन्हा पुन्हा सांगितल्या. अमरनाथ यात्रा ही केवळ श्रद्धेची यात्रा नाही; ती शिस्त, संयम आणि सामूहिक जबाबदारीचीही परीक्षा असते.

त्या दिवशी रात्रीच्या जेवणाची व्यवस्था नांदेडच्या धाडसी महापौर सौ. कविता मुळे यांच्या तर्फे प्रेमपूर्वक केली होती.काश्मीरमधील खाद्यसंस्कृती वेगळी आहे. तेथील मसाल्यांची चव आणि पाककृती महाराष्ट्रातील प्रत्येकालाच लगेच मानवतील असे नाही. म्हणून आम्ही मुद्दाम शोध घेत शर्माजीचा ढाबा गाठला. गरमागरम फुलक्या, डाळ, भाजी आणि साधे पण चविष्ट जेवण मिळाल्यानंतर यात्रेकरूंच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून दिवसाचा सारा थकवा नाहीसा झाला.फोनवरून महापौर ताई सोबत सर्वांचे बोलणे करून दिला. त्यांनी सर्व नांदेडवासीयां तर्फे यात्रेकरूना शुभेच्छा दिल्या. काश्मीर सारख्या ठिकाणी जेवणाची उत्तम व्यवस्था केल्या बद्दल सर्वांनी टाळ्या वाजवून कविताताईंना धन्यवाद दिले. जेवणानंतर आम्ही हॉटेलवर परतलो. पण दिवस अजून संपलेला नव्हता. रूमनिहाय सामानाची विभागणी, औषधांच्या पिशव्या, रेनकोट यासारख्या आवश्यक साहित्य यांची विभागणी करत करत मध्यरात्र उलटली. घड्याळाने बारा वाजल्याची सूचना दिली आणि दिवसाची सांगता झाली.

काश्मीर – इतिहास, संघर्ष आणि नव्या आशेची पहाट

काश्मीरचा इतिहास जितका रम्य, तितकाच संघर्षमय आहे. अनेक राजवटी, युद्धे आणि राजकीय घडामोडींचा साक्षीदार असलेला हा प्रदेश अनेक दशकांपर्यंत विशेष घटनात्मक दर्जामुळे देशापासून काहीसा वेगळा राहिला. ऑगस्ट २०१९ मध्ये कलम ३७० आणि ३५अ रद्द झाल्यानंतर काश्मीरमध्ये विकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. रस्ते, बोगदे, रेल्वे, पर्यटन, गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल दिसून येत आहेत. आज श्रीनगरपर्यंत धावणारी वंदे भारत एक्सप्रेस ही केवळ रेल्वे नाही; तर बदलत्या काश्मीरचे प्रतीक आहे. एकेकाळी दहशतवादाच्या बातम्यांसाठी ओळखला जाणारा हा प्रदेश आता पर्यटनाच्या नव्या विक्रमांसाठी चर्चेत आहे.

सुरक्षेच्या सावलीत फुलणारा स्वर्ग

काश्मीरमध्ये फिरताना प्रत्येक चौकात, प्रत्येक महत्त्वाच्या मार्गावर आणि संवेदनशील भागात भारतीय सैन्य, सीआरपीएफ, बीएसएफ आणि जम्मू-काश्मीर पोलीस सतत सज्ज दिसतात. पर्यटक निश्चिंतपणे फिरतात, यात्रेकरू हजारोंच्या संख्येने बाबा बर्फानींच्या दर्शनासाठी येतात; पण या सुरक्षित वातावरणामागे आपल्या जवानांचे अहोरात्र कर्तव्य असते. हिमालयाच्या कडाक्याच्या थंडीत, कठीण परिस्थितीत आणि सततच्या सतर्कतेत उभे असलेले हे जवान म्हणजे या स्वर्गाचे खरे रक्षक आहेत. त्यांना मनापासून सलाम केल्याशिवाय पुढे जाता येत नाही.

काश्मिरी माणूस – मनाने श्रीमंत

काश्मीरबद्दल अनेक गैरसमज पसरवले जातात; पण प्रत्यक्ष अनुभव मात्र वेगळाच असतो. स्थानिक काश्मिरी लोक अतिशय प्रेमळ, नम्र आणि पाहुणचार करणारे आहेत. दुकानदार असो, हॉटेलमधील कर्मचारी असो किंवा रस्त्यावर भेटणारा सामान्य नागरिक—प्रत्येकाच्या वागण्यात आत्मीयता जाणवते. आमचे टूर ऑपरेटर सज्जादभाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तर प्रत्येक क्षणी आपलेपणाची भावना जपली. धर्म वेगळा, भाषा वेगळी; पण माणुसकीचा धागा मात्र सर्वांना जोडून ठेवतो.

धरतीवरील स्वर्ग… पण मनात एक वेदना

काश्मीरला “धरतीवरील स्वर्ग” म्हणतात, आणि ते अगदी योग्यच आहे. डल लेकचे निळेशार पाणी, चिनारची डोलणारी झाडे, झेलम नदीचा शांत प्रवाह, दूरवरची बर्फाच्छादित शिखरे आणि थंडगार वारा… निसर्गाने सौंदर्याची मुक्त उधळण येथे केली आहे. पण या सौंदर्याच्या मागे संघर्षाची एक वेदनादायक कहाणीही आहे. बंदुका घेऊन उभे असलेले जवान आणि त्याच रस्त्यावर निर्धास्त फिरणारे पर्यटक—हे दृश्य मनाला विचार करायला भाग पाडते. हा स्वर्ग टिकवण्यासाठी कोणीतरी चोवीस तास जागा असतो, ही जाणीव प्रत्येक भारतीयाने मनात ठेवायला हवी.

रात्री झोपायला गेलो तेव्हा घड्याळाने मध्यरात्र ओलांडली होती. बाहेर श्रीनगरच्या थंड वाऱ्याची सळसळ सुरू होती आणि मनात मात्र उद्याच्या प्रवासाची उत्सुकता उसळत होती. उद्या आम्ही बालटालच्या दिशेने निघणार होतो. पुढे हिमालयाची कठीण चढाई, हजारो भाविकांचा “हर हर महादेव”चा जयघोष, लंगरांची सेवा, सुरक्षा दलांची साथ आणि शेवटी बाबा बर्फानींचे दिव्य दर्शन… या विचारांनी डोळ्यांत झोप नव्हती.मनात एकच भावना होती—
“आतापर्यंतचा प्रवास हा तयारीचा होता; उद्यापासून खरी अमरनाथ यात्रा सुरू होणार होती. आता प्रत्येक पाऊल बाबा बर्फानींच्या दिशेने पडणार होते… आणि प्रत्येक श्वासात ‘हर हर महादेव’चा निनाद घुमणार होता.” प्रवास हा तयारीचा होता; उद्यापासून खरी अमरनाथ यात्रा सुरू होणार होती. आता प्रत्येक पाऊल बाबा बर्फानींच्या दिशेने पडणार होते… आणि प्रत्येक श्वासात ‘हर हर महादेव’चा निनाद घुमणार होता.”                        (क्रमश 🙂

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!