
नांदेड | भारतीय हवामान विभागाने नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर नांदेड-वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी तातडीने ॲक्शन मोड घेत शहरातील पूरप्रवण व संवेदनशील भागांची प्रत्यक्ष पाहणी केली.



उर्दू घर परिसर, असदवन–लातूर फाटा नाला, रवीनगर–कौठा पोलीस चौकी तसेच शगुन सिटी परिसराची पाहणी करून त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. नाल्यांची तातडीने सफाई, पाणी निचऱ्याचे मार्ग मोकळे ठेवणे, अतिरिक्त कर्मचारी व यंत्रसामग्री तैनात करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.




तसेच, मनपाचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास तीन शिफ्टमध्ये कार्यरत ठेवण्याचे आदेश देत सर्व झोनल अधिकारी व अभियंत्यांनी मुख्यालय न सोडण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सर्व उपाययोजना तत्काळ राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


