स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी नांदेड जिल्हा प्रशासनाची कडक मोहीम; गर्भवती महिलांचे ट्रॅकिंग सुरू

नांदेड | स्त्रीभ्रूणहत्या आणि बेकायदेशीर गर्भलिंगनिदानाला आळा घालण्यासाठी नांदेड जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा आता पूर्णपणे ‘ॲक्टिव्ह मोड’वर आली आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार पहिली किंवा दोन मुली असलेल्या कुटुंबांतील गर्भवती महिलांचे प्रसूतीपर्यंत नियमित ट्रॅकिंग करण्यात येत असून, या मोहिमेच्या अंमलबजावणीला चार महिने पूर्ण होत आले आहेत.

या मोहिमेअंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गर्भधारणेची नोंदणी झाल्यानंतर संबंधित महिलेचा दरमहा फॉलोअप घेतला जात असून, विशेषतः पहिली किंवा दोन मुली असलेल्या कुटुंबांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.

दरम्यान, आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून होणारे बेकायदेशीर गर्भलिंगनिदान रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी केंद्रांची सखोल तपासणी करण्यात येणार आहे. संशयास्पद प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवून दोषींवर कठोर कारवाईचे संकेत आरोग्य प्रशासनाने दिले आहेत.

जिल्ह्यातील दुर्गम भागातही आरोग्य अधिकारी स्वतः मोहिमेचा आढावा घेत असून, आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. या उपक्रमामुळे मुलींच्या जन्मदरात सुधारणा होऊन स्त्रीभ्रूणहत्येच्या घटनांना आळा बसेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!