
नांदेड | नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे २६ जून रोजी आयोजित शासकीय कार्यक्रमादरम्यान प्रकृती बिघडून जखमी झालेल्या दिव्यांग युवक कार्तिक कुमार भरतीपूरम यांना अद्यापही आवश्यक मदत मिळालेली नसल्याचा आरोप करत सकल दिव्यांग संघटनेने प्रशासनाकडे तातडीच्या मदतीची मागणी केली आहे.



या संदर्भात सकल दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष राहुल सिताराम साळवे यांनी २ जुलै रोजी निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांच्याकडे सविस्तर निवेदन सादर केले. या निवेदनाची अधिकृत आवक घेण्यात आली असून, त्याच्या प्रती विभागीय आयुक्त, पोलीस अधीक्षक, अधिष्ठाता डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही ई-मेलद्वारे पाठविण्यात आल्या आहेत.



निवेदनानुसार, शासकीय कार्यक्रमादरम्यान कार्तिक कुमार भरतीपूरम यांची प्रकृती अचानक बिघडून ते खाली कोसळले. या घटनेत त्यांच्या सक्षम हाताला गंभीर दुखापत झाली. आधीच पॅरॅलिसिसमुळे एक हात व एक पाय बाधित असताना आता सक्षम हातही जखमी झाल्याने त्यांचे दैनंदिन जीवन अत्यंत कठीण झाले आहे. जेवण करणे, कपडे घालणे, शौचालयाचा वापर करणे यांसारख्या मूलभूत कामांसाठीही त्यांना इतरांवर अवलंबून राहावे लागत आहे.


कार्तिक कुमार हे वृद्ध आई-वडिलांचे एकुलते एक पुत्र असून, पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागल्याने कुटुंबावर मोठा आर्थिक भार पडला आहे. त्यामुळे त्यांना तातडीची आर्थिक मदत, उपचार खर्चाची प्रतिपूर्ती, आवश्यक वैद्यकीय उपचार आणि पुनर्वसन उपलब्ध करून देण्याची मागणी संघटनेने केली आहे.


यासोबतच या संपूर्ण घटनेची वस्तुनिष्ठ चौकशी करून भविष्यात शासकीय कार्यक्रमांमध्ये दिव्यांगांसाठी सुरक्षित बसण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी, व्हीलचेअर, वैद्यकीय पथक, आपत्कालीन आरोग्य सुविधा आणि इतर मूलभूत सोयी अनिवार्य करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
“हा विषय केवळ एका दिव्यांग युवकाचा नसून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने दिव्यांगांच्या सुरक्षिततेबाबत ठोस धोरण आणि प्रभावी उपाययोजना राबविणे अत्यावश्यक आहे. कार्तिक कुमार भरतीपूरम यांना तातडीने न्याय व आवश्यक मदत मिळावी,” अशी मागणी सकल दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष राहुल सिताराम साळवे यांनी केली आहे.
