
नांदेड | नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित शासकीय कार्यक्रमात प्रकृती बिघडून कोसळलेल्या दिव्यांग युवकाच्या अडचणी आता आणखी वाढल्या आहेत. आधीच एका हाताला व एका पायाला पक्षाघात (पॅरॅलिसिस) झालेल्या कार्तिक कुमार भरतीपूरम यांच्या सक्षम हातालाही फ्रॅक्चर झाल्याने त्यांचे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर सकल दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी प्रशासनाने तातडीने आर्थिक मदत व संपूर्ण उपचाराचा खर्च उचलावा, अशी मागणी केली आहे.



दिनांक २६ जून २०२६ रोजी तत्कालीन पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या निरोप समारंभ आणि नवनियुक्त पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या स्वागत कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान दीर्घकाळ प्रतीक्षा, अपुऱ्या मूलभूत सुविधा आणि प्रकृती बिघडल्यामुळे कार्तिक कुमार भरतीपूरम हे अचानक खाली कोसळले. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.



मात्र, त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत आणखी बिघाड झाला असून, आधीच पॅरॅलिसिसमुळे बाधित असलेल्या शरीरासोबत आता त्यांच्या सक्षम हातालाही फ्रॅक्चर झाले आहे. त्यामुळे स्वतः जेवणे, कपडे घालणे, शौचालयाचा वापर करणे यासह दैनंदिन कामे करणेही त्यांच्यासाठी अत्यंत कठीण झाले आहे.


प्राथमिक उपचारासाठी त्यांना डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी येथे दाखल करण्यात आले होते. मात्र पुढील उपचारासाठी कुटुंबीयांना खाजगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागल्याने आर्थिक भार मोठ्या प्रमाणात वाढला आहे.


कार्तिक कुमार हे वृद्ध आई-वडिलांचे एकुलते एक अपत्य असून, त्यांच्या आजच्या गंभीर अवस्थेमुळे संपूर्ण कुटुंबावर मानसिक, शारीरिक आणि आर्थिक संकट कोसळले आहे.
सकल दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष, माजी अशासकीय सदस्य (संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती) तथा पत्रकार राहुल साळवे यांनी जिल्हा प्रशासनाकडे कार्तिक कुमार भरतीपूरम यांना तातडीची आर्थिक मदत, संपूर्ण उपचाराचा खर्च, आवश्यक पुनर्वसन आणि सर्व शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
यासोबतच या घटनेची वस्तुनिष्ठ चौकशी करून भविष्यात शासकीय कार्यक्रमांमध्ये दिव्यांगांसाठी पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था, व्हीलचेअर, वैद्यकीय पथक आणि आपत्कालीन आरोग्य सुविधा अनिवार्य करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
राहुल साळवे म्हणाले, “दिव्यांगांचा सन्मान केवळ सत्कारापुरता मर्यादित न ठेवता त्यांच्या सुरक्षिततेची, आरोग्याची आणि सन्मानाने जगण्याची जबाबदारीही प्रशासनाने स्वीकारली पाहिजे. कार्तिक कुमार भरतीपूरम यांना तातडीने न्याय व आवश्यक मदत मिळावी.”
