
नांदेड | नांदेडच्या रेल्वे प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी असून, ६ जुलै २०२६ रोजी नांदेड–मुंबई आणि टनकपूर–नांदेड या दोन नवीन एक्सप्रेस गाड्यांचा शुभारंभ होणार आहे. या गाड्यांमुळे नांदेडचा राज्याची राजधानी मुंबई तसेच देवभूमी उत्तराखंडशी थेट रेल्वे संपर्क प्रस्थापित होणार असून प्रवासी, भाविक, विद्यार्थी, व्यावसायिक आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.



या दोन्ही गाड्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रवनीत सिंह, जितिन प्रसाद आणि अजय टम्टा हेही ऑनलाइन सहभागी होणार आहेत.



हजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावर होणाऱ्या स्थानिक कार्यक्रमाला मंत्री अतुल सावे, खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, खासदार रवींद्र चव्हाण, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद तिडके यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.


गाड्यांची वैशिष्ट्ये
नांदेड–मुंबई एक्सप्रेस आठवड्यातून दोन दिवस अकोला–मनमाड मार्गे धावणार. गाडीत आरक्षित व अनारक्षित दोन्ही प्रवासाची सुविधा उपलब्ध. टनकपूर–नांदेड साप्ताहिक एक्सप्रेस नांदेडहून रविवारी, तर टनकपूरहून मंगळवारी सुटणार. महाराष्ट्रातून देवभूमी उत्तराखंडशी थेट रेल्वे संपर्क उपलब्ध होणार. पर्यटन, तीर्थयात्रा, व्यापार, शिक्षण आणि आरोग्य सेवांसाठी प्रवास अधिक सुलभ होणार.


दक्षिण मध्य रेल्वेच्या या उपक्रमामुळे नांदेडसह मराठवाड्याचा रेल्वे संपर्क अधिक सक्षम होणार असून प्रदेशाच्या सामाजिक, आर्थिक आणि पर्यटन विकासाला नवी चालना मिळणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
