नांदेडमध्ये १ लाख बांबू लागवड मोहिमेला प्रारंभ; जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या हस्ते शुभारंभ

३७.५० लाख वृक्षलागवडीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम
नांदेड | पर्यावरण संवर्धन, जलसंधारण आणि हरित नांदेडच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत मृद व जलसंधारण विभागाच्या १ लाख बांबू लागवड मोहिमेचा शुभारंभ आज मौजे सालेगाव (ता. धर्माबाद) येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या हस्ते करण्यात आला.

यंदाच्या पावसाळी हंगामात नांदेड जिल्ह्यासाठी ३७ लाख ५० हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, त्याअंतर्गत मृद व जलसंधारण विभागाला १ लाख बांबू लागवडीचे विशेष उद्दिष्ट देण्यात आले आहे. पूर्ण झालेल्या नाला खोलीकरण व इतर जलसंधारण कामांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर बांबू लागवड करून पर्यावरण संवर्धनाला चालना देण्याचा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे.

यावेळी उपविभागीय अधिकारी राऊत, तहसीलदार श्रीमती स्वामी, जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री. कांबळे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी श्री. मोरे, IGSSS संस्थेचे अधिकारी, सालेगावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बांबूच्या मजबूत मुळव्यवस्थेमुळे मातीची धूप रोखणे, नाल्यांच्या काठांची स्थिरता राखणे, जलसंधारणाच्या कामांचे संरक्षण, जैवविविधतेचे संवर्धन आणि कार्बन शोषण वाढविणे यासाठी या लागवडीचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे जलसंधारणाच्या संरचनांची कार्यक्षमता वाढण्याबरोबरच ग्रामीण भागातील हरित क्षेत्रातही लक्षणीय वाढ होणार आहे.

आगामी काळात जिल्ह्यातील नाला खोलीकरण, सिमेंट नाला बांध, माती नाला बांध आणि इतर जलसंधारण प्रकल्पांच्या परिसरात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर बांबू लागवड करण्यात येणार असून, निश्चित कालावधीत १ लाख बांबू लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा विभागाचा मानस असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

याप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी प्रत्येक नागरिकाने वृक्षलागवड करून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. “वृक्ष लावणे जितके महत्त्वाचे, तितकेच त्यांचे संवर्धन आणि संरक्षण करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे,” असे त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!