
विजया रहाटकर, डॉ. बालाजी आसेगावकर, मंदार भारदे आणि दिव्या देशमुख यांचाही गौरव
नांदेड | मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिष्ठेचा मानला जाणारा दैनिक सत्यप्रभाचा कै. सौ. कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कार यंदासाठी जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी प्रथमच ‘डॉ. शंकरराव चव्हाण जीवनगौरव पुरस्कार’ सुरू करण्यात आला असून, त्याचे पहिले मानकरी म्हणून लोकमत समूहाचे एडिटर-इन-चिफ तथा माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांची निवड करण्यात आली आहे.



याशिवाय महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, स्नेहसावलीचे संस्थापक डॉ. बालाजी आसेगावकर, मॅब एव्हिएशनचे संस्थापक मंदार भारदे आणि महिला बुद्धिबळ विश्वविजेती दिव्या देशमुख यांना यंदाचा कै. सौ. कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.



दैनिक सत्यप्रभाचे कार्यकारी संपादक संतोष पांडागळे यांनी पुरस्कारांची घोषणा केली. पुरस्कारासाठी निवड समितीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण होते. समितीत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चास्कर, प्रख्यात वैद्यकतज्ज्ञ डॉ. नंदकुमार मुलमुले, वरिष्ठ पत्रकार संजीव कुलकर्णी, राजेश निस्ताने आणि उद्योजक सुमित मोरगे यांचा समावेश होता.


माजी केंद्रीय गृहमंत्री तथा माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त गेल्या २२ वर्षांपासून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येत आहे. यापूर्वी जॅकी श्रॉफ, फ. मु. शिंदे, डॉ. तात्यासाहेब लहाने, संजय बांगर, मकरंद अनासपुरे, महावीर जोंधळे, चंद्रकांत कुलकर्णी, डॉ. निलेश खरे, वामन केंद्रे, प्रतीक्षा लोणकर, राध्येश्याम मोपलवार, डॉ. विपिन इटणकर यांसारख्या मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.


पुरस्कार वितरण सोहळा जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मान्यवरांच्या उपस्थितीत नांदेड येथे संपन्न होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
