
मुंबई | राज्यात 4 ते 6 जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, मुंबई महानगर क्षेत्र (MMR), कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.



मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असून, सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरही मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.



या कालावधीत सखल भागांमध्ये पाणी साचणे, वाहतूक विस्कळीत होणे, घाटरस्त्यांवर दरडी कोसळण्याचा धोका तसेच काही ठिकाणी मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष अथवा संबंधित महानगरपालिकांच्या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


