अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणावरून काँग्रेस नेत्यांविरोधात सिडकोत ‘जोडेमार’ आंदोलन

मातंग समाजाचा तीव्र संताप; नाना पटोले व विजय वडेट्टीवार यांच्या भूमिकेचा निषेध
नवीन नांदेड | अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाला विरोध केल्याचा आरोप करत काँग्रेसचे नेते आमदार नाना पटोले आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्या प्रतिमेला सिडको येथील डॉ. अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ मातंग समाज बांधवांनी गुरुवारी (२ जुलै) जोडेमार आंदोलन करत तीव्र निषेध व्यक्त केला.

महाराष्ट्रातील मातंग समाजाची अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या १ ऑगस्ट २०२४ च्या निर्णयानंतर तेलंगणा आणि कर्नाटक राज्यांमध्ये उपवर्गीकरणाची अंमलबजावणी झाली असून, महाराष्ट्रातही त्याच धर्तीवर निर्णय व्हावा, अशी समाजाची अपेक्षा आहे.

यासाठी राज्य शासनाने निवृत्त न्यायमूर्ती बदर यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना केली होती. आयोगाने आपला अहवाल शासनाकडे सादर केल्यानंतर उपवर्गीकरणाचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा समाजात व्यक्त केली जात होती. मात्र, काँग्रेस नेते नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत या उपवर्गीकरणाला विरोध केल्याचा आरोप करत समाजबांधवांनी संताप व्यक्त केला.

या निषेध आंदोलनात काँग्रेस नेत्यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला. तसेच मातंग समाजाला न्याय देण्यासाठी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.

आंदोलनात भाजप अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष जनार्दन गुपिले, सामाजिक कार्यकर्ते माधव डोम्पले, ब्लॅक पॅंथरचे संस्थापक अध्यक्ष अंकुश गायकवाड, शिवसेनेचे पप्पू गायकवाड, दशरथ कंधारे, आनंदा गायकवाड, रमेश तालीमकर, सुरेश कांबळे, महादेव गवाले, विकास जगदळे, प्रवीण ढाकनीकर, साईनाथ घोसले यांच्यासह समाजातील अनेक ज्येष्ठ व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

समाजाच्या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!