
नवीन नांदेड | मतदार यादी विशेष पुनरिक्षण मोहिमेला गती देण्यासाठी नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पुढाकार घेत मनपा हद्दीतील जुना कौठा येथे नागरिकांच्या घरी जाऊन मतदार नोंदणी अर्ज स्वतः भरून घेतले. जिल्हाधिकाऱ्यांच्या या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.



जुना कौठा येथील प्रतिष्ठित नागरिक तथा माजी नगरसेवक राजू गोरे यांच्या निवासस्थानी भेट देत जिल्हाधिकाऱ्यांनी संभाजी रामजी गोरे यांचा मतदार नोंदणीसाठीचा एसआयआर (SIR) अर्ज बीएलओच्या उपस्थितीत स्वतः भरून घेतला. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मतदार नोंदणी प्रक्रियेत सहभाग नोंदविला.



नांदेड तहसीलदार संजय वारकड यांच्या मार्गदर्शनाखाली वसरणी विभागातील भाग क्रमांक १८२ मध्ये मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. या मोहिमेत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह मतदार नोंदणी अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, एआरओ अविनाश शिगारे, पर्यवेक्षक अंगद जाधव, तसेच बीएलओ वळसे, भोकरे, वाकरडकर, स्वामी आणि इतर कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष घरोघरी जाऊन अर्ज भरून घेतले.


यावेळी मारोती गोरे, रोहीदास काकडे, प्रल्हाद काळे, कृष्णा बारसे, मेजर जायभाये, माणिक गोरे यांच्यासह प्रभागातील अनेक नागरिक उपस्थित होते.



जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः नागरिकांच्या घरी जाऊन मतदार नोंदणी अर्ज भरून घेतल्याने प्रशासनाबद्दल नागरिकांमध्ये विश्वास वाढला असून, मतदार नोंदणी मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र जुना कौठा येथे पाहायला मिळाले.
