हिमायतनगर SBI चा मनमानी कारभार? ८७ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले; संतापाची लाट

पंचायत समितीकडून धनादेश वेळेत दिल्याचा दावा; बँकेच्या हलगर्जीपणाचा आरोप, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट, उपासमारीची वेळ.! 
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील तब्बल ८७ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन रखडल्याने भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) स्थानिक शाखेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पंचायत समितीकडून वेतनाचा धनादेश वेळेत जमा करूनही अनेक दिवस उलटून गेले, तरी कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार जमा न झाल्याने संतापाची लाट उसळली आहे.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पंचायत समितीने दिनांक २४ जून रोजी सुमारे ७ लाख ६९ हजार रुपयांचा धनादेश बँकेत जमा केला. मात्र, अनेक दिवस उलटूनही वेतन खात्यात न आल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. घरखर्च, कर्जाचे हप्ते आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च यामुळे अनेक कर्मचाऱ्यांची कोंडी झाली आहे.

याप्रकरणी कर्मचाऱ्यांनी भारतीय स्टेट बैंक शाखेत वारंवार चौकशी केली असता समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. उलट, प्रश्न विचारणाऱ्या कर्मचाऱ्यांशी अरेरावीची वागणूक दिली जात असल्याच्याही तक्रारी पुढे आल्या आहेत.

दरम्यान, शाखा व्यवस्थापकांनी तांत्रिक अडचणींमुळे धनादेश वटला नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, ही तांत्रिक अडचण नेमकी काय, ती दूर करण्यासाठी कोणती पावले उचलली, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी वेतन तात्काळ खात्यात जमा करून संबंधित प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली असून, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनासारख्या अत्यावश्यक बाबतीत होणारा हा विलंब प्रशासन आणि बँकिंग व्यवस्थेच्या समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!