
नांदेड | नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदाची सूत्रे महेश पाटील यांनी गुरुवारी अधिकृतपणे स्वीकारली. पदभार स्वीकारताच त्यांनी जिल्हा परिषदेतील सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेत प्रशासनाला गतिमान करण्याचे स्पष्ट संकेत दिले.


प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी महेश पाटील यांच्याकडे पदभार सुपूर्द केला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
यापूर्वी सारथी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत असलेल्या महेश पाटील यांची शासनाने नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती केली आहे.


पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी सर्व खातेप्रमुखांची बैठक घेऊन प्रत्येक विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. शासनाच्या लोकाभिमुख योजनांची प्रभावी अंमलबजावणी, विकासकामांना गती, पारदर्शक प्रशासन आणि नागरिकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करून योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर विशेष भर देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.


बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश देशमुख, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. नीलकुमार ऐतवडे, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक मयूरकुमार आंदेलवाड यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.


नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्या नियुक्तीमुळे जिल्हा परिषदेच्या विकासकामांना अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
