लोकप्रतिनिधींच्या असहकारामुळे मराठवाड्याचा विकास खुंटला -डॉ. कोम्पलवार

नांदेड, गोविंद मुंडकर| मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींच्या मराठवाडा जनता विकास परिषदेला असलेल्या असहकारामुळे मराठवाड्याचा विकास खुंटला, असा संताप म.ज. वि.प.चे जिल्हाध्यक्ष व बाभळी बंधाऱ्याचे योद्धे डॉ.बालाजी कोम्पलवार यांनी आनंदधाम, सीताखंडी, तालुका भोकर येथे संपन्न झालेल्या जिल्हा बैठकीत व्यक्त केला.

याप्रसंगी मराठवाड्याचे अध्यक्ष डॉ. सोमनाथ रोडे, रेल्वे संघर्ष समितीचे शंतनू डोईफोडे, समाजसेवक डॉक्टर अशोक बेलखोडे, बाभळी बंधारा कृती समितीचे अध्यक्ष नागोराव पाटील रोशनगावकर, नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रवीण पाटील, प्राचार्य डॉ. लक्ष्मण शिंदे, उपप्राचार्य डॉक्टर खिल्लारे, सीमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक गोविंद मुंडकर ,समाजसेवक भाऊराव मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

विरोधी पक्षात असताना राजकीय मंडळी मराठवाडा जनता विकास परिषदेमध्ये सक्रिय असतात परंतु सत्तेत गेल्यावर मात्र म.ज.वि.प.च्या विकास कामाकडे असहकार करतात. विकासाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा सुद्धा करीत नाही. बाभळी बंधाराच्या खटल्या संदर्भात तेलंगणा राज्याचे 12 ते 15 आमदार व मंत्री हाय कोर्टात उपस्थित असायचे आणि आम्ही सात-आठ कार्यकर्तेच असायचो.

महाराष्ट्रातून एकही आमदार किंवा खासदार या प्रकरणी संवेदनशील नव्हते ,तसेच अनेक वर्षापासून मराठवाडा वैधानिक विकास मंडळाला राज्यपालानी मुदत वाढ दिलेली नाही. यासाठी लोकप्रतिनिधींनीही काही प्रयत्न केला नाही . त्यामुळे मराठवाड्याचा विकास खुंटला,असे संतापजनक वक्तव्य डॉ.बालाजी कोम्पलवार यांनी करून लोकप्रतिनिधींच्या विकासाबाबतच्या अनास्थ्येवर प्रहार केला. यावरून लोकप्रतिनिधींनी व निवडून देणाऱ्या मतदारांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज स्पष्ट होते.

-बैठकीत एक मताने ठराव मंजूर:

1. मराठवाडा वैधानिक विकास मंडळाला राज्यपालानी मुदतवाढ द्यावी.
2. नांदेड व लातूरला महसूल आयुक्तालय व्हावे
3.( साबळे) धरणासाठी शासनाने शेतकऱ्यांच्या अधीगृहीत केलेल्या जमिनी परत कराव्या किंवा त्याचा मावेजा द्यावा.
4. प्रत्येक तालुक्यातील एमआयडीसी मध्ये कृषीवर आधारित कारखाने व्हावे
5. शेतकऱ्यांना पेन्शन मिळावी.
6. शासनाने जाहीर केलेला कृषी उत्पादनाचा भाव आणि बाजारात असलेला भाव यातील फरक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा.
वरील मागण्या बैठकीमध्ये एक मताने मंजूर झाल्या आहेत .तरी याचा शासनाने सहानुभूतीपूर्वक व सकारात्मक विचार करण्याची गरज आहे.

” विरोधी पक्षात असताना कार्यकर्ते रेल्वे संघर्ष आंदोलनात असतात. पण सत्तेत गेल्यावर प्रश्न सुद्धा मांडत नाही, याची खंत वाटते. ” – रेल्वे संघर्ष समितीचे शंतनू डोईफोडे

” तरुणांना म. ज. वि. परिषदेत सामावून घेतल्यास विकासाभिमुख लढा उभा राहील आणि पेपर व पक्ष फोडा-फोडीची परिस्थिती विकास कामास बाधक आहे. आमदार व खासदार अभ्यासू नसल्यानेच विकास कामासाठी आक्रमक नाहीत त्यामुळे विकास होत नाही. “ -समाजसेवक डॉ. अशोक बेलखोडे

” महाराष्ट्र व तेलंगणाच्या सीमावर्ती भागाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने स्वतंत्र वैधानिक विकास मंडळाची स्थापना करावी. नांदेड आकाशवाणी कडे शासनाने लक्ष द्यावे. – सीमावर्ती भागाचे,प्रमुख समन्वयक – गोविंद मुंडकर

” प्रत्येक जिल्ह्यात मराठवाडा जनता विकास परिषदेचे काम करण्यासाठी फुल टायमर असावा. त्यासाठी प्रत्येक महिन्याला मी 1000 रुपये देणार आणि जिल्हाध्यक्षाकडे दिले. संघटना वाढल्याशिवाय आंदोलन होत नाही. महसूल आयुक्तालय नांदेड व लातूर साठी दोनची मागणी करायला पाहिजे, तरच आयुक्तालयाचा प्रश्न सुटेल. ” -ज्येष्ठ विधीज्ञ धोंडीबा पवार

” मराठवाडा जनता विकास परिषदेला जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरावेच लागेल. परंतु परिषदेला अधिक सक्रिय करण्यासाठी युवकांना परिषदेत सामील करून घेणे आवश्यक आहे. शासनाने मराठवाडा वैधानिक विकास मंडळाला मुदत वाढ द्यावी. तरच मराठवाड्यातील विकासाचा अनुशेष भरून निघेल. ” -प्राचार्य डॉक्टर सोमनाथ रोडे, अध्यक्ष, मराठवाडा जनता विकास परिषद

या कार्यक्रमात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ.शिवदास हमंद, उमाकांत जोशी , वसंत मय्या ,विजय होकरणे ,संभाजी शिंदे पाटील, गोविंदराव सिंदीकर,विश्वंभर पवार, बिलोलीचे माधव पटणे, बी. आर. पांचाळ, धर्माबादचे मिसाळे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी काळवणे यांनी केले तर आभार पत्रकार विठ्ठल फुलारी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!