टीईटी व नीट पेपरफुटीविरोधात नांदेडमध्ये डिवायएफआयचे तीव्र आंदोलन

शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
नांदेड | महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) आणि नीट (NEET) प्रश्नपत्रिका फुटीच्या निषेधार्थ डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) च्या वतीने बुधवारी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

२८ जून रोजी होणाऱ्या टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका एक दिवस आधीच फुटल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. यापूर्वी नीट परीक्षेतील गैरव्यवहाराचे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एकदा पेपरफुटी झाल्याने लाखो विद्यार्थी, बेरोजगार युवक-युवती आणि पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

डिवायएफआयच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत परीक्षा व्यवस्थेतील भ्रष्टाचाराचा निषेध केला. विद्यार्थ्यांनी महिनोनमहिने कठोर परिश्रम, आर्थिक खर्च आणि मानसिक तयारी करूनही त्यांच्या भविष्याशी वारंवार खेळ केला जात असल्याचा आरोप संघटनेने केला.

“विद्यार्थ्यांच्या भविष्याशी क्रूर खेळ”
यावेळी डिवायएफआयचे जिल्हाध्यक्ष स्टॅलिन आडे म्हणाले, “नीट आणि टीईटीच्या लागोपाठ झालेल्या पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी क्रूर खेळ सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.”

आंदोलनादरम्यान पेपरफुटी प्रकरणाची उच्चस्तरीय, निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशी करण्याची, दोषींना कठोर शिक्षा देण्याची, विद्यार्थ्यांच्या झालेल्या मानसिक व आर्थिक नुकसानीची दखल घेण्याची तसेच भविष्यात पेपरफुटी रोखण्यासाठी पारदर्शक व सुरक्षित परीक्षा प्रणाली लागू करण्याची मागणी करण्यात आली.
मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही डिवायएफआयने दिला. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

या आंदोलनात जिल्हाध्यक्ष स्टॅलिन आडे, जिल्हा सचिव इरफान पठाण, श्याम सरोदे, जय गायकवाड, जेतालाल राठोड, सुभाष गजभारे, प्रेमला पतंगे, करवंदा गायकवाड, अंबादास भंडारे, दिगंबर घायाळे, एसएफआयचे पवन जगडमवार, प्रफुल काऊंडकर, आडेलू बोनगीर, सुनीता बोनगीर आदींसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले. सीटूचे जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड यांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!