देवदर्शनाला गेलेल्या कुटुंबालाच मुलाने घातला दगा! दोन दिवसांत घरफोडीचा पर्दाफाश

मुलगा व विधिसंघर्षग्रस्त बालिकेकडून ₹9.36 लाखांची रोख रक्कम जप्त

नांदेड | नायगाव येथील घरफोडीच्या गाजलेल्या गुन्ह्याचा अवघ्या दोन दिवसांत पर्दाफाश करत स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत कौशल्यपूर्ण तपासातून धक्कादायक सत्य समोर आणले आहे. घरफोडीच्या कटाचा सूत्रधार दुसरा-तिसरा कोणी नसून फिर्यादीचाच मुलगा असल्याचे निष्पन्न झाले. त्याने एका विधिसंघर्षग्रस्त बालिकेच्या मदतीने घरातील ₹9 लाख 70 हजारांची रोकड लंपास करण्याचा कट रचल्याचे उघड झाले असून, पोलिसांनी ₹9 लाख 36 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्याचा वेगाने तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि नागनाथ तुकडे व त्यांच्या पथकाने गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली.

तपासादरम्यान फिर्यादीचा मुलगा शुभम कौठकर याच्याकडे संशयाच्या आधारे चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत, कुटुंब देवदर्शनासाठी बाहेर जाणार असल्याची माहिती, घराच्या अतिरिक्त चावीचे ठिकाण आणि घरात प्लॉट खरेदीसाठी ठेवलेली मोठी रोकड याची माहिती आपल्या मैत्रिणीला दिल्याचे सांगितले.

पूर्वनियोजित कटानुसार 26 जून 2026 रोजी कुटुंब बाहेर गेल्यानंतर संबंधित विधिसंघर्षग्रस्त बालिकेने अतिरिक्त चावीने घरात प्रवेश करून लोखंडी पेटीत ठेवलेली ₹9.70 लाखांची रोकड चोरून नेली. आरोपीच्या कबुलीनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत ₹9.36 लाख 600 रुपयांची रोख रक्कम हस्तगत केली. या अचूक व जलद तपासामुळे घरफोडीचा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आला असून, आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर), अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव (नांदेड) यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि नागनाथ तुकडे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!