भरमसाठ वेतन नव्हे, ज्ञानसेवेची निष्ठाच खरी संपत्ती; प्रभावती शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रेरणादायी कार्य

नांदेड, गोविंद मुंडकर| शिक्षण ही केवळ नोकरी नसून समाजपरिवर्तनाची अखंड साधना आहे, याची प्रचिती प्रभावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक परिसराला दिलेल्या प्रत्यक्ष भेटीदरम्यान आली. आधुनिक सुविधा, प्रशस्त इमारत, पारदर्शक प्रशासन, ज्ञानदानासाठी समर्पित शिक्षकवृंद आणि अत्यल्प वेतनातही अविरत सेवा देणारे कर्मचारी यामुळे ही संस्था शिक्षणक्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करत असल्याचे स्पष्टपणे जाणवले.

माध्यम प्रतिनिधींनी संस्थेला भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा, अभ्यासासाठी पोषक वातावरण आणि शिस्तबद्ध कामकाज पाहून संस्थेची गुणवत्ता अधोरेखित झाली. संस्थेच्या प्रत्येक घटकात शिक्षणाविषयीची तळमळ आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची बांधिलकी दिसून आली.

यावेळी संस्थेचे ग्रंथपाल गणेश देशमुख यांनी अत्यंत मनोगतपूर्ण शब्दांत संस्थेची कार्यसंस्कृती स्पष्ट केली. “येथे भरमसाठ वेतनाला महत्त्व नाही, तर ग्रंथांच्या सहवासातून मिळणारे बौद्धिक समाधान आणि ज्ञानसेवेची निष्ठा हेच आमचे खरे धन आहे. मानधनापेक्षा ग्रंथांविषयीची आस्था, विद्यार्थ्यांप्रती असलेली बांधिलकी आणि संस्थेप्रती असलेली निष्ठा अधिक महत्त्वाची मानली जाते,” असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, निष्ठावान शिक्षक व कर्मचाऱ्यांमुळेच कोणतीही संस्था दीर्घकाळ टिकून राहते आणि प्रगतीची नवी क्षितिजे गाठते. आर्थिक मर्यादा असल्या तरी गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण देण्याचा संस्थेचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे.

कायम विनाअनुदानित स्वरूपात कार्यरत असलेल्या या महाविद्यालयात अत्यल्प वेतनावरही शिक्षक आणि कर्मचारी पूर्ण समर्पणाने ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. शिक्षण ही समाजाप्रती असलेली जबाबदारी मानून कार्य करणारा हा समूह विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

संस्थेच्या प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पारदर्शक प्रशासन, शिस्तबद्ध नियोजन आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण हीच संस्थेची बलस्थाने आहेत. संचालक मंडळाच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे संस्था आजही खंबीरपणे उभी असून विद्यार्थीकेंद्री कार्यपद्धतीला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते.

सध्या संस्थेत दहा अध्यापक आणि सात कर्मचारी यांच्या बळावर शैक्षणिक कार्य सुरळीत सुरू आहे. उपलब्ध मनुष्यबळाच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सर्वजण एकजुटीने कार्यरत असल्याचेही सांगण्यात आले.

संस्थेत सध्या BCA, BCS आणि MSc हे अभ्यासक्रम यशस्वीपणे सुरू असून आधुनिक काळातील रोजगाराभिमुख शिक्षणावर विशेष भर दिला जात आहे. गुणवत्तापूर्ण अध्यापन, विद्यार्थ्यांसाठी पूरक शैक्षणिक वातावरण आणि मूल्याधिष्ठित शिक्षण या त्रिसूत्रीच्या आधारावर संस्था आपली शैक्षणिक वाटचाल अधिक सक्षमपणे पुढे नेत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

आजच्या स्पर्धेच्या युगात आर्थिक लाभापेक्षा ज्ञानसेवा, प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली निष्ठा यांना सर्वोच्च स्थान देणारी ही संस्था अनेक शैक्षणिक संस्थांसाठी प्रेरणादायी आदर्श ठरत असून, शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन असल्याचा संदेश आपल्या कार्यातून देत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!