वझरा शे.फ. येथे दारूबंदीच्या मागणीला महिलांचा ठोस पाठिंबा; ३२५ पैकी २९९ महिलांच्या स्वाक्षरी-अंगठ्यांची पडताळणी

दोन बिअर बार व एका बिअर शॉपीविरोधात महिलांचा पुढाकार; राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून स्वाक्षरी पडताळणी व जनजागृती

नांदेड/माहूर, प्रतिनिधी| माहूर तालुक्यातील वझरा शेख फरीद ग्रामपंचायत हद्दीत दारूबंदीच्या मागणीसाठी महिलांनी दिलेल्या निवेदनातील स्वाक्षऱ्या व अंगठ्यांची पडताळणी प्रक्रिया रविवारी, १६ ऑगस्ट रोजी पूर्ण करण्यात आली. गावातील एकूण ३२५ महिलांपैकी तब्बल २९९ महिलांच्या स्वाक्षरी अथवा अंगठ्यांची नोंद घेण्यात आल्याने दारूबंदीच्या मागणीला महिलांचा ठोस प्रतिसाद मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या किनवट कार्यालयाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, वझरा शे.फ. येथे सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत ही प्रक्रिया राबविण्यात आली. यासाठी प्रशासनाकडून सहा टेबलची व्यवस्था करण्यात आली होती.

गावातील महिलांनी दारूबंदीच्या मागणीसाठी निवेदन सादर केले होते. त्यातील महिलांच्या स्वाक्षऱ्यांची प्रत्यक्ष पडताळणी करून गावात दारूबंदीबाबत जनजागृती करण्याचे निर्देश राज्य उत्पादन शुल्क विभागाला देण्यात आले होते. यासंदर्भात सरपंच दीपक केंद्रे, माकपचे सचिव कॉ. गंगाधर गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते दीपक मुंडे, विजय नागरगोजे व ग्रामपंचायत अधिकारी कृष्णा कराड यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक श्री. कदम यांची भेट घेऊन निवेदन दिले होते.

या मागणीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपनिरीक्षक सागर शेलार, किनवटचे निरीक्षक ए. जे. कुरेशी तसेच दुय्यम निरीक्षक व जवान यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी पडताळणीची प्रक्रिया पार पडली. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच दीपक केंद्रे, ग्रामपंचायत अधिकारी कृष्णा कराड, पोलीस पाटील रितेश केंद्रे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक व शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.

दारूबंदीच्या परिणामांबाबत जनजागृती – दारूमुळे कुटुंबव्यवस्था, महिलांचे जीवन, आर्थिक परिस्थिती आणि गावातील सामाजिक वातावरणावर होणाऱ्या परिणामांबाबत महिलांमध्ये जनजागृती करण्यात आली. महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दारूबंदीच्या मागणीला पाठिंबा दिल्याने या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान, वझरा शेख फरीद येथे दोन बिअर बार आणि एक बिअर शॉपी असल्याची माहिती देण्यात आली आहे. दारूबंदीची प्रक्रिया पुढे सरकत असताना आगामी निवडणूक प्रक्रियेतही दारूबंदीचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार असून, ‘आडवी बाटली जिंकणार’ अशी परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा वझरा शे.फ.चे मूळ निवासी तथा कामगार नेते कॉ. गंगाधर गायकवाड यांनी केला.

दारूबंदीच्या मागणीला मिळालेला महिलांचा प्रतिसाद पाहता गावातील सामाजिक वातावरण सुधारण्यासाठी प्रशासन, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या संयुक्त प्रयत्नांना आता अधिक बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!