पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला भोकरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद; ४ हजारांहून अधिक बालकांपैकी ३,६९३ जणांना लस

नांदेड /भोकर |  राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत रविवारी (दि. २८ जून) भोकर शहरात मोठ्या उत्साहात लसीकरण मोहीम राबविण्यात आली. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रताप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष भगवान दंडवे यांच्या हस्ते हनुमान मंदिर येथील बूथवर बालकांना पोलिओची मात्रा पाजून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी जिल्हास्तरीय अधिकारी डॉ. विष्णू मलसेठवार यांनी ग्रामीण रुग्णालयातील बूथला भेट देत नवजात बालकांनाही पोलिओची मात्रा पाजली तसेच शहरातील विविध लसीकरण केंद्रांची पाहणी केली.

भोकर शहरातील ० ते ५ वर्षे वयोगटातील ४,०१५ अपेक्षित लाभार्थ्यांपैकी ३,६९३ बालकांना पहिल्याच दिवशी पोलिओची मात्रा देण्यात आली. या मोहिमेसाठी शहरात २१ लसीकरण बूथ, ३ ट्रान्झिट टीम आणि १ मोबाईल टीम कार्यरत होत्या.

आरोग्य निरीक्षक सत्यजीत टिप्रेसवार यांनी सांगितले की, सोमवारपासून पुढील सहा दिवस ८ पथकांमार्फत घरभेटी (IPPI) घेऊन उर्वरित बालकांना पोलिओची मात्रा पाजण्यात येणार आहे.

या मोहिमेत अंगणवाडी सेविका, मदतनीस, हत्तीरोग विभागाचे कर्मचारी, नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी, स्वयंसेवक तसेच ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

जनजागृती प्रभात फेरीने दिला लसीकरणाचा संदेश

लसीकरण मोहिमेच्या पूर्वसंध्येला (दि. २७ जून) भोकर शहरात भव्य जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली. जिल्हा परिषद नूतन शाळा, विमल इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी तसेच ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या रॅलीत सहभाग घेत नागरिकांना पोलिओ प्रतिबंधाबाबत जागरूक केले.

ग्रामीण रुग्णालय ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या रॅलीत पोलिओ निर्मूलनाच्या घोषणा देत नागरिकांना आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओची मात्रा पाजण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी विमल इंग्लिश स्कूलचे संचालक लक्ष्मण नाईक जाधव, संचालिका डॉ. रंजू नाईक जाधव, मुख्याध्यापक सादिक शेख, शिक्षकवृंद तसेच ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी, आरोग्य कर्मचारी व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!