पत्रकारांना धमकी प्रकरणावर पत्रकार संघटनांचा संताप; संजय दिना पाटील यांच्यावर कारवाईची मागणी

मुंबई | पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप असलेल्या खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि डिजिटल मीडिया परिषद यांनी तीव्र निषेध केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी केली आहे.

पत्रकारांनी त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत प्रश्न विचारण्यासाठी घरी भेट दिली असता, संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ करत, “पुन्हा आलात तर मारून टाकीन” अशा स्वरूपाची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही भाषा एका खासदाराला शोभणारी नसून लोकशाही आणि प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर आघात करणारी असल्याचे पत्रकार संघटनांनी म्हटले आहे.

याशिवाय, “माझ्याकडे बॉम्ब आहे” आणि “मी पाच खून केले आहेत” अशा कथित वक्तव्यांचीही चौकशी करून सत्य समोर आणावे, तसेच त्यांना देण्यात आलेली ‘वाय’ दर्जाची सुरक्षा पुनर्विचारात घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

या निषेधपत्रावर अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, मुंबई विभागीय सचिव दीपक कैतके तसेच डिजिटल मीडिया परिषदेचे अनिल वाघमारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टीप: या बातमीत नमूद केलेले आरोप पत्रकार संघटनांच्या प्रसिद्धीपत्रकावर आधारित आहेत. संबंधित प्रकरणात अधिकृत तपास किंवा संबंधित पक्षाची भूमिका उपलब्ध झाल्यास तीही प्रसिद्ध करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!