
लोहा | भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीचे विशेष सखोल पुनर्निरीक्षण (Special Intensive Revision – SIR) 2026 अभियान लोहा तालुक्यात ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत प्रत्येक मतदाराने गणना फॉर्म (EF) भरून संबंधित बीएलओकडे जमा करणे अनिवार्य असल्याचे आवाहन सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी केले आहे.


या कालावधीत तालुक्यातील प्रत्येक मतदान केंद्रावरील बीएलओ (Booth Level Officer) मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना फॉर्म वितरित करणार आहेत. संबंधित मतदारांनी हा फॉर्म काळजीपूर्वक भरून, अलीकडील पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो व आवश्यक कागदपत्रांसह बीएलओकडे जमा करावा. गणना फॉर्म न भरल्यास संबंधित मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळले जाऊ शकते, असा इशाराही तहसीलदार परळीकर यांनी दिला आहे.


आवश्यक कागदपत्रे
मतदारांनी गणना फॉर्मसोबत पुढीलपैकी आवश्यक पुरावे सादर करावेत –
२००२ पूर्वीची मतदार यादी किंवा जुनी निवडणूक पावती
जमीन/मालमत्तेची कागदपत्रे किंवा भाडेकरार
नागरिकत्व प्रमाणपत्र
कायमस्वरूपी रहिवासी प्रमाणपत्र
नोंदणी प्रमाणपत्र
पासपोर्ट


एलआयसी पॉलिसीची कागदपत्रे
शासनाने दिलेले अधिकृत परवाना किंवा प्रमाणपत्र
शासकीय/निमशासकीय नोकरीचे प्रमाणपत्र
बँक किंवा पोस्ट ऑफिस पासबुक
जन्म प्रमाणपत्र
बोर्ड किंवा विद्यापीठाचे शैक्षणिक प्रमाणपत्र
न्यायालयीन नोंदी किंवा कायदेशीर कागदपत्रे
रेशन कार्ड


तहसीलदार विठ्ठल परळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार अशोक मोकले, निवडणूक नायब तहसीलदार डॉ. संदीप हाडगे, निवडणूक विभाग प्रमुख राजेश गायंगी, महसूल सहाय्यक बालाजी उटलवाड, ईश्वर धुळगंडे, सूर्यकांत पांचाळ, महेंद्र कांबळे यांच्यासह संपूर्ण निवडणूक यंत्रणा या अभियानासाठी कार्यरत आहे.
