
पुणे | पुण्यातील ऐतिहासिक महात्मा फुले वाडा परिसरातील वटवृक्षाच्या पूजनावर घालण्यात आलेले निर्बंध राज्य शासनाने मागे घेतले असून, यापुढे पूर्वीप्रमाणे वटपौर्णिमेनिमित्त पारंपरिक वटपूजन करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे वटसावित्री व्रत करणाऱ्या महिलांना दिलासा मिळाला आहे.


यासंदर्भात हिंदु जनजागृती समिती, राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती, हिंदु राष्ट्र समन्वय समिती, सुराज्य अभियान आणि रणरागिणी शाखा यांच्या शिष्टमंडळाने पुरातत्त्व विभाग, पोलीस प्रशासन आणि पुणे महानगरपालिका प्रशासनाकडे निवेदने सादर करून निर्बंध मागे घेण्याची मागणी केली होती.


या पार्श्वभूमीवर पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे साहाय्यक संचालक डॉ. विलास वाहने यांनी खडक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पत्र पाठवून महात्मा फुले वाडा राज्य संरक्षित स्मारक घोषित होण्यापूर्वीपासून सुरू असलेल्या परंपरा आणि चालीरीती कायम ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच वटपौर्णिमेच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.


दरम्यान, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी हा निर्णय हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पाठपुराव्याचे यश असल्याचे सांगितले. तसेच पूजनावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर शासनाने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. फडणवीस सरकारने निर्बंध मागे घेतल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. याचबरोबर समितीने वटपौर्णिमेच्या दिवशी अधिकाधिक महिलांनी महात्मा फुले वाडा येथे उपस्थित राहून पारंपरिक पद्धतीने वटवृक्षाचे पूजन करण्याचे आवाहन केले आहे.


